गॅससाठी घरगुती उपाय
अनेकांना महिन्यातून कधीतरी पोटात गॅसचा त्रास होतो. पण, असे अनेक लोक आहेत ज्यांना दररोज पोटात गॅसचा त्रास होतो. पोट फुगलेले राहिल्यास आरामात बसता येत नाही किंवा आरामात कोणतेही काम करता येत नाही. त्याच वेळी, पोटातून बाहेर पडणारा गॅस आपल्यासाठी तसेच आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी त्रासदायक ठरतो.
बहुतेकवेळा बाहेरून जास्त खाल्ल्याने किंवा कुजलेले अन्न खाल्ल्याने गॅस तयार होतो. त्याचबरोबर जास्त तळलेले अन्न खाल्ल्यानेही अपचन होते आणि अन्नाचे पचन नीट होत नाही, त्यामुळे गॅस होतो. जर तुम्हालाही दररोज गॅसचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनीगॅसपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती वस्तू कशा उपयोगी ठरतात सांगितले आहे. विशेषत: स्वयंपाकघरातील काही मसाल्यांचे सेवन करून गॅसपासून आराम मिळू शकतो. (फोटो सौजन्य – iStock)
बडीशेप
गॅससाठी बडिशेपचा वापर
स्वयंपाकघरातील हा मसाला एकच नाही तर पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम देतो. बडीशेपमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात आणि हा मसाला थंड असून पोटाला आराम देणारा आहे. त्यामुळेच नेहमी अन्नपचन होण्यासाठी जेवणानंतर बडिशेप खाल्ली जाते. बडीशेप तुम्ही कच्ची खाऊ शकता किंवा गॅसपासून आराम मिळण्यासाठी एका ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप उकळा आणि हे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने गॅसची समस्या कमी होते आणि अपचनापासूनही आराम मिळतो.
ओवा
ओवा ठरतो गुणकारी
पोटदुखी असो किंवा पोट फुगणे असो, सेलेरी अर्थात ओव्याच्या सेवनाने ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते. ओवा विशेषतः गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे. त्याचे अँटीमायक्रोबियल गुणधर्म गॅस कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. ओवा पाण्यात उकळवून हे पाणी गरम करून प्यायल्याने पोटाला आराम मिळतो. लहान मुलांच्या बेंबीवर तर ओवा भाजून लावल्यानेही फायदा मिळतो. त्याचे रेचक गुणधर्म बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासाठीदेखील उपयुक्त आहेत.
जिरे
गॅसवर जिऱ्याचा वापर
गॅस किंवा गॅस्ट्रिकच्या समस्यांमध्येही जिऱ्याचे फायदे दिसून येतात. जिऱ्यातील अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म विशेषत: आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. पाण्यात जिरे टाकून उकळा आणि हे पाणी प्यायल्याने गॅसची समस्या दूर होऊन पोटाला आराम मिळतो. तुम्ही रात्रभर एक ग्लास पाण्यात जिरे भिजवू शकता. हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे गरम करून प्यावे, यामुळे पोटातील गॅस निघून जातो.
धणे
धणे ठरतील वरदान
पोटासाठी फायदेशीर मसाल्यांमध्ये धन्याचाही समावेश होतो. धण्यामध्ये पचनास फायदा देणारे गुणधर्म असतात. या धान्यांपासून शरीराला अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणि अनेक फायदेशीर अँटी-ऑक्सिडंट्स देखील मिळतात. हे धान्य दाह कमी करण्यासाठीदेखील प्रभावी ठरतात. धणे उकळून त्याचे पाणी पिण्यानेही गॅस कमी होतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.