
फोटो सौजन्य - Social Media
साल २००० मधील ही थरारक कथा अमेरिकेतील कुप्रसिद्ध रूट ६६६ या महामार्गाभोवती फिरते. या रस्त्याला “द डेविल्स हायवे” असे म्हटले जात होते. ६६६ हा अंक सैतानाशी जोडला जात असल्याने या रस्त्याबद्दल अनेक भयानक अफवा आणि गोष्टी प्रचलित होत्या. लोकांमध्ये अशी समजूत होती की या रस्त्यावर गेलेला माणूस परत येत नाही किंवा विचित्र अनुभव घेऊनच बाहेर पडतो.
कथा चार मित्रांची आहे – रोहित, त्रिशा, अनन्या आणि गौरव. पदवी पूर्ण झाल्यानंतर ते अमेरिकेतील अॅरिझोना येथे फिरायला जाण्याचा बेत आखतात. प्रवासादरम्यान महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी लागते. वेळ वाचवण्यासाठी रोहित शॉर्टकट म्हणून गाडी रूट ६६६ कडे वळवण्याचा निर्णय घेतो. त्यांनी गाडी वळवली तेव्हा मागच्या गाड्यांचे चालक हॉर्न वाजवून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, जणू काही त्या रस्त्याबद्दल सावध करत होते. मात्र मित्रमंडळी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघतात.
रस्त्यावर पुढे जात असताना त्यांना ‘माइल १३’ असा बोर्ड दिसतो. त्याच वेळी गाडीत चालू असलेले गाणे अचानक बंद होते आणि रेडिओवरून एक विचित्र, भयावह आवाज ऐकू येतो. तो आवाज इशारा देतो की या रस्त्यावर फक्त वेदनादायी मृत्यूच मिळणार असून प्रत्येक दहा मिनिटांनी काहीतरी भयंकर घडणार आहे. हा संदेश ऐकून सर्वजण घाबरून जातात. यानंतर अचानक गाडी बंद पडते. रोहित गाडीची तपासणी करताना नंबर प्लेटकडे पाहतो आणि थक्क होतो. त्याच्या गाडीचा नंबर बदलून ६६६ झालेला दिसतो.
यानंतर घटनांची मालिका सुरू होते. त्रिशाला गाडीत बसताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. ती घाबरून बाहेर पडते आणि तेवढ्यात वेगाने आलेला ट्रक तिला धडक देतो. काही वेळाने तोच ट्रक अचानक येऊन गौरवला चिरडून जातो. शेवटी रोहितलाही त्या ट्रकचा बळी पडल्याचे त्याला दिसते. या सगळ्या घटनांनी वातावरण पूर्णपणे भयावह बनते.
मात्र अचानक रोहितचे डोळे उघडतात. तो अजूनही ड्रायव्हिंग सीटवरच बसलेला असतो आणि बाकीचे मित्र सुरक्षित असतात. त्याला समजते की त्याने जे काही पाहिले ते प्रत्यक्षात घडलेले नसून एक भयानक भ्रम होता. अनन्या त्याला सांगते की त्या परिसरात उंची जास्त असल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे ‘हाय अल्टिट्यूड सेरेब्रल एडिमा’ नावाच्या अवस्थेमुळे माणसाला भास होऊ शकतात. रूट ६६६ बद्दल आधीपासून ऐकलेल्या भीतीदायक गोष्टी रोहितच्या मनात असल्यामुळे त्याला हे सर्व खरे वाटले. शेवटी रोहित वेळ वाचवण्याचा मोह सोडतो आणि गाडी पुन्हा मुख्य महामार्गाकडे वळवतो. या अनुभवातून त्याला समजते की कधी कधी भीती आणि अफवा आपल्या मनावर इतका परिणाम करतात की वास्तव आणि कल्पना यांच्यातील सीमा अस्पष्ट होते.