बदलतत्या वातावरणामुळे कोणते आजार कसे डोकं वर काढतील सांगता येत नाही. हे काही वर्षात आलेल्या कोरोनाने जगाला पटवून दिलं आहे. यामुळे धावपळीच्या जगात भविष्याची काळजी करताना स्वत:च्या आरोग्याकडे देखील पाहिले पाहिजे. अनेक लोकं आहार संतुलित नसल्याने विविध आजाराने ग्रासलेले आहेत.
लसीकरणाचा विचार करताना, बरेचदा आपल्याला लहानपणी घेतलेल्या रोगप्रतिबंधक लसी आणि दंडावर घेतलेल्या इंजेक्शन्सची आठवण येते. पण सर्वच वयोगटांसाठी लसीकरण तितकेच महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
जगभरात न्युमोकॉक्कल संसर्ग हे प्रौढांमध्ये वारंवार होताना दिसतात आणि त्यांना लसींद्वारे प्रतिबंध करणे मोठ्या प्रमाणात शक्य असते. हे आजार म्हणजे जगभरात आरोग्याला असलेल्या काही सर्वात लक्षणीय मात्र प्रतिबंध करता येण्याजोग्या धोक्यांपैकी एक असून कुटुंबांना या आजारांपासून व त्यांच्या परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यामध्ये लसी महत्त्वाची भूमिका बजावतात.
न्युमोकॉक्कल आजार म्हणजे स्ट्रेप्टोकॉक्कस न्युमोनाय (Streptococcus pneumoniae) नावाच्या बॅक्टेरियांमुळे होणारा संसर्ग असून त्याच्या परिणामी कानांना जंतुसंसर्ग होणे, रक्तप्रवाहात जंतूसंसर्ग होणे आणि मेनेन्जायटिस हे आजार होऊ शकतात. हे बॅक्टेरिया खोकण्यातून किंवा शिंकण्यातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत वेगाने पसरू शकतात. न्युमोकॉक्कल आजारांवर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते प्राणघातक ठरू शकतात.
लहान मुलांना या आजारांचा धोका अधिक असला तरीही प्रौढ व्यक्ती आणि इंटर्स्टिशियल लंग डिजिज (ILD), क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजिज (COPD), अस्थमा, डायबेटिस, हृदयविकार किंवा कमकुवत रोगप्रतिकारशक्ती अशा आरोग्याच्या तक्रारी आधीपासूनच असलेल्या व्यक्तींना हा संसर्ग होण्याचा अधिक धोका असतो. न्युमोकॉक्कल आजार श्वसनाशी संबंधित सौम्य लक्षणांपासून बळावत जात वेगाने गंभीर रूप धारण करतात. त्य़ामुळेच हा आजार किती भयंकर आहे हे लक्षात येतं.
आशियावर न्युमोनिया आजाराचा भार सर्वात जास्त आहे आणि भारत व भारतीय उपखंडाचा या आजाराच्या ओझ्यामध्ये सर्वात मोठा वाटा असल्याचे जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या २००८ सालच्या अहवालातून दिसून आले. इतकेच नव्हे तर कम्युनिटी अक्वायर्ड न्युमोनिया (COD) हे या क्षेत्रामध्ये संसर्गजन्य आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंमागचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे कारण असल्याचे भारताच्या संदर्भात घेण्यात आलेल्या एका पाहणीच्या निष्कर्षांतून असे उघडकीस आले. भारतातील ५० वर्षे व त्यावरील वयाच्या प्रौढांना न्युमोकॉक्कलस संसर्गाचा धोका हा प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे संशोधनातून दिसून येते.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी आणि व्होरा क्लिनिक, मुंबईचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अगम व्होरा म्हणाले, “न्युमोकॉक्कल लस ही स्ट्रेप्टोकॉक्कस न्युमोनायमुळे होणाऱ्या मेनेन्जायटिस, सेप्सिस, फुफ्फुसांचा संसर्ग या आजारांसह प्राणघातक संसर्गांच्या एका मोठ्या प्रवर्गाविरोधात संरक्षण पुरविणारी एक आधारशीला म्हणून उदयास आली आहे. अनेक भारतीय वैद्यकीय संघटना आणि क्लिनिकल प्रॅक्टिससाठीच्या मार्गदर्शक सूचनांतून मिळणाऱ्या चालू पुराव्यांमधून प्राथमिक संचातील लसी घेणाऱ्या बाळांपासून ते आक्रमक आजारांविरुद्ध संरक्षणाची गरज असलेल्या प्रौढांपर्यंत सर्व वयोगटांसाठी या लसींची शिफारस सुस्पष्टपणे प्रस्थापित झालेली दिसते.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्सच्या प्रौढ लसीकरणासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये लसीकरण फक्त वयोवृद्ध किंवा आधीपासून काही आजार असलेल्यांसाठीच नव्हे तर निरोगी प्रौढांसाठीही आहेत, यावर भर देण्यात आला आहे. वेळच्यावेळी केलेले लसीकरण हे न्युमोकॉक्कल आजारांमुळे येणारे गंभीर आजारपण, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे व मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे तर ही लस एकूणच आरोग्य जपण्यासाठी व अनेक सर्वसाधारण संसर्गांपासून संरक्षण पुरविण्यासाठी मदत करते.
प्रतिबंध हा उपचारांहून अधिक चांगला तर आहेच, पण तो अधिक सुलभ, अधिक सुरक्षित आणि खूपच किफायतशीरही आहे. PCV (न्युमोकॉक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन) ने केलेले लसीकरण हे न्युमोकॉक्कल आजारांचा भार कमी करण्यासाठीचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडील सर्वात प्रभावी साधन मानले जाते.” लसीकरणामुळे कुटुंबांना दीर्घकाळ संरक्षणाचे कवच मिळते. न्युमोकॉक्कल बॅक्टेरियाच्या अनेक उपप्रकारांचा प्रसार होत असताना, या आजारांची लागण होण्याचा धोका नेहमीच जास्त आहे. म्हणूनच लसीकरण हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी उचललेले एक हुशारीचे पाऊल ठरते.
लसीकरण घेण्याबरोबरच जंतूंच्या संसर्गात येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला
1. चांगली स्वच्छता बाळगा: आपले हात नियमितपणे नीट धुवा आणि शिंकताना वा खोकताना आपले तोंड झाका, खोकण्या/शिंकण्याचे सामाजिक शिष्टाचार पाळणे हे कदाचित तुम्हाला झालेल्या संसर्गापासून तुमच्या भोवतीच्या माणसांना संरक्षण पुरविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
2. धोका असलेल्यांना सुरक्षित ठेवा: तुम्हाला श्वसनसंस्थेच्या आजारांची लक्षणे जाणवत असतील किंवा एखाद्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाण्यासारख्या मोठ्या जोखमीच्या ठिकाणी तुम्ही असाल तर नेहमी मास्क लावा.
3. रोगप्रतिकारशक्ती तयार करा: पोषण, झोप, नियमित शारीरिक व्यायाम आणि धूम्रपानाची सवय सोडणे या गोष्टी रोगप्रतिकारशक्तीला बळ देण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन फायदे मिळवून देतात.
4. अँटिबायोटिक्सचा समजूतदारपणे वापर करा: स्वत:हून औषधे घेणे टाळा, कारण विनाकारण अँटिबायोटिक्सचा वापर केल्यास संसर्गांवर उपचार करणे अधिकाधिक कठीण होत जाते.
न्युमोकॉक्कल आजार गंभीर असले तरीही लसीकरणाच्या माध्यमातून त्यांचा प्रतिबंध करणे शक्य आहे. लसीकरण आणि त्याजोडीला निरोगी जीवनशैलीचे पर्याय निवडणे यामुळे कुटुंब सुरक्षित राहतील व संसर्गांचा प्रतिकार करू शकतील याची शाश्वती मिळते. प्रौढांसाठीची नेक्स्ट-जनरेशन न्युमोकॉक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सीन आता भारतात उपलब्ध आहे. ती आधीच्या काळातील इतर न्युमोकॉक्कल कॉन्ज्युगेट लसींच्या तुलनेत अधिक उपप्रकारांपासून व्यापक संरक्षण पुरविते, व प्रौढांना अनेक न्युमोकॉक्कल आजारांपासून संरक्षण पुरविते.
लस घेतल्यानंतर, रोगप्रतिकारशक्ती न्युमोकॉक्कल बॅक्टेरियांकडून संसर्ग प्रस्थापित केला जाण्यापूर्वीच त्यांना ओळखते आणि निष्प्रभ करण्यास सक्षम अशा काही विशिष्ट अँटिबॉडीज विकसित करते. आपल्यासाठी योग्य लस निवडण्यासाठी आपल्याला आरोग्यसेवा पुरविणाऱ्यांशी बोलणे महत्त्वाचे आहे.