Government Agriculture Scheme ( सरकारी कृषी योजना )
या योजनेत वैयक्तिक जमिनीवर चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपये, तर सार्वजनिक जमिनीवर तब्बल १ लाख ५५ हजार ३ रुपये अनुदान मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात पशुधनाला संजीवनी आणि मजुरांना रोजगार, असा दुहेरी लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
पंढरपूर तालुक्यातील सर्व पशुपालकांनी चारा लागवड करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर पंचायत समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे यांनी केले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पाण्याअभावी उभी पिकेही होरपळली आहेत.
रब्बी हंगामासाठी पुरेसा पाऊस नसल्याने हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही धोक्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या पशुधनासाठी चारा उपलब्ध करणे हे शेतकऱ्यांसमोरील गंभीर आव्हान बनले आहे. जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांना सतावत असताना शासनाने चारा लागवडीसाठी स्वतंत्र सुधारित आदेश काढून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
या योजनेत मका, ज्वारी, बाजरी, नेपीयर गवत, मेथीघास, लसूणघास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट अशा विविध चारा पिकांच्या लागवडीला मंजुरी देण्यात आली आहे. शासकीय गायरान तसेच वैयक्तिक शेतजमिनीवर चारा उत्पादन घेता येणार आहे. विशेष म्हणजे, केवळ चारा डेपो उभारण्याऐवजी गावातच हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढवून टंचाईवर कायमस्वरूपी उपाय करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
चारा टंचाईमुळे पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये, तसेच गावपातळीवरच हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढावे, हा या योजनेमागील हेतू आहे. शासनाच्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जनावरांच्या चारा प्रश्नाला दिलासा मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार हातांनाही काम मिळू शकणार आहे.
शासनाच्या तरतुदीनुसार बाजरी लागवडीसाठी हेक्टरी ३५ हजार ५०५ रुपये, ज्वारीसाठी ४२ हजार ७७८ रुपये, नेपीयर गवतासाठी ७६ हजार रुपये, लसूणघासासाठी १ लाख १३ हजार २९० रुपये, तर ज्वारी मल्टीकटसाठी ५१ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. बाजरी मल्टीकटसाठीही अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे.
चारा लागवड योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पशुधनासाठी चारा उत्पादनाबरोबरच ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रति एकर चारा लागवडीसाठी २४५ मनुष्यदिवसांच्या मजुरीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापोटी ७७ हजार ६६५ रुपये मजुरांच्या खात्यात जमा होणार आहेत.
जमीन तयार करणे, बियाणे, खते आणि सिंचन व्यवस्थेसाठी ४४ हजार १५० रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे चारा उत्पादनासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही आधार मिळणार आहे. चारा लागवडीसाठी जमिनीची साफसफाई, पूर्वमशागत, रोटावेटर, सरी पाडणे, बियाणे, बीजप्रक्रिया, टोकण पद्धतीने लागवड, खत व्यवस्थापन, सहा वेळा पाणी देणे, खुरपणी, कीड व्यवस्थापन, कापणी, मका कुट्टी, मुरघास तयार करणे आणि बॅगा भरणे अशा विविध कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ९५ दिवस रोजगार उपलब्ध होणार असून अकुशल कामासाठी ३० हजार ११५ रुपये, तर कुशल कामासाठी १७ हजार ११२ रुपये असे एकूण ४७ हजार ३०७ रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची तरतूद आदेशात नमूद आहे.
या योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. चारा लागवडीसाठी किमान ५० गुंठे ते एक एकर क्षेत्र असणे आवश्यक असून, चारा पिकांच्या वाढीसाठी किमान सिंचन सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीतील रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा. अर्जासोबत सातबारा उतारा, आठ-अ दाखला, आधारकार्ड, बँक पासबुकची छायाप्रत आणि जॉब कार्ड जोडणे आवश्यक आहे.
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून, आगामी काळात निर्माण होणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा लागवडीचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्व शेतकरी व पशुपालकांनी मका, ज्वारी, मेथीघास यांसारख्या चारा पिकांची लागवड करून जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत चारा लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानाचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा. यासाठी पशुपालकांनी पुढाकार घेऊन चारा लागवडीचे नियोजन करावे, असे आवाहन पंढरपूर समितीचे सभापती डॉ. शुभम आगवणे यांनी केले आहे.






