मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा येथे शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. (Photo - X)
Nagpur News : दिवाळी म्हटलं की आनंद, फराळ आणि नातेवाईकांसोबतच्या गप्पा आल्याच! पण यंदाची दिवाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काहीशी वेगळी ठरली. दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. एवढंच नाही, तर घरच्या सदस्याप्रमाणे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. सकाळी घरगुती तर्री पोह्यांचा आस्वाद घेतला आणि अरुणाताईंनी त्यांची भाऊबीजही केली.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी दिवाळी साजरी केली. सायंकाळी कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर त्यांनी घरातच मुक्काम केला. रात्री थंडी असल्याने कुटुंबीयांनी शेकोटी पेटवली होती. मात्र, शेकोटीचा आनंद घेण्याची संधी मिळाली नाही, याची खंत मुख्यमंत्र्यांनी गप्पांमध्ये बोलून दाखवली.
सकाळी उठल्यानंतर बालपांडे कुटुंबातील महिलांनी स्वतःच्या हाताने बनवलेले तर्री पोहे मुख्यमंत्र्यांना वाढले. पोहे आपल्याला खूप आवडतात आणि आठवड्यातून किमान चार दिवस नाश्त्याला पोहे असतात, असं फडणवीस यांनी गप्पांच्या ओघात सांगितलं.
दिवाळीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी बालपांडे कुटुंबात अभ्यंगस्नानही केलं. त्यानंतर अरुणाताईंनी भावाच्या नात्याने त्यांचं औक्षण केलं आणि भाऊबीज साजरी केली. यावेळी अरुणाताईंनी अगदी आपुलकीने, ‘दादा, पुढच्या वर्षी वहिनींना सोबत घेऊन या’, अशी विनंती केली. या छोट्याशा प्रसंगाने उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं.
बालपांडे कुटुंबातील सात महिन्यांची नारायणी हिची ही पहिलीच दिवाळी होती. मुख्यमंत्र्यांसोबत पहिला दिवाळसण साजरा झाल्याचा आनंद कुटुंबीयांनी व्यक्त केला. मोठी झाल्यावर नारायणीला हे फोटो दाखवणार असल्याचं तिचे वडील प्रवीण यांनी सांगितलं.
याच भेटीदरम्यान 75 वर्षीय कमलाबाई मानेराव यांनी आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. बकरीपालनासाठी मदत आणि अपंग मुलाच्या आर्थिक मदतीची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या निराधार अनुदानाबाबतही तपासणी करण्यास सांगितलं.
बालपांडे कुटुंबाचा निरोप घेताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आदरातिथ्याबद्दल आभार मानले. शेतकऱ्यांच्या अडचणी असूनही परिस्थितीशी लढण्याची त्यांची जिद्द प्रेरणादायी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Ans: नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी केली.
Ans: अरुणाताईंनी मुख्यमंत्र्यांची भाऊबीज केली आणि पुढच्या वर्षी दिवाळीसाठी वहिनींना सोबत घेऊन या, अशी आपुलकीची विनंती केली.
Ans: कमलाबाईंनी बकरीपालनासाठी मदत आणि अपंग मुलासाठी आर्थिक सहाय्य मागितले. याशिवाय त्यांच्या निराधार अनुदानाच्या प्रकरणाची पडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.






