Pitru Paksh 2025 : पितरांच्या शांतीसाठी आणि पिंडदानासाठी सर्वश्रेष्ठ मानली जातात ही तीर्थस्थळे; इथे जाऊनच मिळेल मोक्ष
हिंदू धर्मात श्राद्ध व पितृपक्ष यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. वर्ष 2025 मध्ये पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबरपासून झाली असून हा कालखंड 21 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे 15 दिवस चालणार आहे. या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्धकर्म करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवसांत केलेले तर्पण थेट पितरांपर्यंत पोहोचते आणि सात पिढ्यांपर्यंतचे पूर्वज तृप्त होतात. या काळात अनेक लोक भारतातील विविध पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देऊन पिंडदान करतात. या स्थळांवर केलेले श्राद्धकर्म अत्यंत फलदायी मानले जाते. चला तर जाणून घेऊ या अशा काही प्रमुख स्थळांविषयी.
1. गया, बिहार
गया हे पितृतिर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे फल्गु नदीच्या काठी केलेले पिंडदान सात पिढ्यांच्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती देते, अशी श्रद्धा आहे. रामायण कथेनुसार माता सीतेनेही येथेच आपल्या पितरांसाठी पिंडदान केले होते.
2. वाराणसी, उत्तर प्रदेश
काशी नगरीला भगवान शंकरांची नगरी व मोक्षाचे द्वार मानले जाते. मणिकर्णिका घाट व दशाश्वमेध घाटावर केलेले पिंडदान आणि तर्पण पूर्वजांना शांती देते. गंगेच्या किनाऱ्यावर केलेले श्राद्धकर्म विशेष फलप्रद मानले जाते.
3. प्रयागराज, उत्तर प्रदेश
गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्या येथे एकत्र येतात. या त्रिवेणी संगमावर केलेले पिंडदान व तर्पण पितरांना तृप्त करणारे मानले गेले आहे.
4. हरिद्वार, उत्तराखंड
गंगा नदीच्या तीरावर वसलेले हरिद्वार प्राचीन काळापासून श्राद्धासाठी महत्त्वाचे केंद्र मानले गेले आहे. हर की पौडी येथे केलेले पिंडदान पूर्वजांच्या आत्म्यास शांती देतं.
5. बद्रीनाथ, उत्तराखंड
ब्रह्मकपाल घाटावर केलेले पिंडदान गया पेक्षा आठपट अधिक फलदायी मानले जाते. विशेषतः अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी येथे श्राद्ध करण्याची परंपरा आहे.
6. कुरुक्षेत्र, हरियाणा
महाभारताशी जोडलेले कुरुक्षेत्र पितृदोष निवारणासाठी महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. येथे पितृपक्षात श्राद्ध व पिंडदान केल्याने पितृदोष कमी होतो आणि पितरांना मोक्ष मिळतो, असे मानले जाते. पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना तर्पण व पिंडदानाद्वारे आदर अर्पण करण्याचा कालखंड आहे. भारतातील ही पवित्र स्थळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर आध्यात्मिक समाधान देणारीही मानली जातात.
पितृपक्षाचं महत्त्व काय?
या काळात पूर्वजांचे आत्मे त्यांच्या वंशजांकडून अर्पण स्वीकारण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात असे मानले जाते, ज्यामुळे त्यांना कुटुंबासाठी शांती आणि आशीर्वाद मिळण्यास मदत होते.
पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
मांसाहारी पदार्थ, केस किंवा नखे कापणे, भव्य सोहळे करणे या गोष्टी पितरांचा अनावर करू शकतात. विधी दरम्यान शांतता, आदर आणि प्रामाणिकपणाची स्थिती ठेवा.