भारतात चेन्नईमध्ये HIV ची बाधा झालेला पहिला रुग्ण १९८६ साली आढळला होता. त्यानंतर पुढील काही वर्षांत HIV बाधितांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पण गेल्या काही वर्षांत HIV विषयक जनजागृतीचं प्रमाण वाढलं आहे. लोक पुढे येऊन उपचार घेत असल्याने तसंच प्रतिबंधक उपाययोजनांमुळे गेल्या काही वर्षांत HIV बाधितांच्या संख्येत घट होत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं. २०१९ च्या आकडेवारीनुसार, भारतात २३ लाख २९ हजार नागरिक HIV सोबत जगत आहेत. सध्या नव्याने HIV बाधित होण्याचं प्रमाण २०१० पेक्षा ३७ टक्क्यांनी खाली घसरलं. तर १९९७ च्या उच्चांकाच्या तुलनेत हे प्रमाण ८६ टक्क्यांनी खाली आलं आहे.
‘मला HIVची लागण झाली पण या गोळीने मी अनेकांचा जीव वाचवू शकलो’ या महिलेच्या शरीराने स्वतःच पळवून लावला HIV जेव्हा दूषित रक्त दिल्यामुळे हजारो जणांना HIVची लागण झाली होती दरम्यान, गेल्या काही वर्षांत HIV ला तोंड देण्यासाठी PrEP नामक उपचार पद्धतही जगभरात काही देशांत वापरली जात आहे. या निमित्ताने आपण PrEP औषधोपचाराबद्दल माहिती घेऊ.
PrEP म्हणजेच प्रि-एक्स्पोजर प्रॉफिलायसिस (Pre-Exposure Prophylaxis) नामक एक टॅबलेट. ही गोळी रोजच्या रोज अथवा सेक्स होण्यापूर्वी काही काळ आधी घेतल्यास HIV चा संसर्ग टाळता येऊ शकतो. प्री-एक्स्पोझर प्रोफिलॅक्सिस किंवा प्रेप ही गोळी सेक्स करण्यापूर्वी घ्यावी लागते. काही जण ही गोळी रोज घेतात तर काही फक्त सेक्सच्या आदल्या किंवा नंतरच्या दिवशी घेतात. जर कंडोम न वापरता सेक्स केला आणि HIV बाधित व्यक्तीशी शारीरिक संबंध झाला तर प्रेप HIV विषाणूंना शरीरातील रक्तात मिसळण्यापासून कायमस्वरूपी अटकाव करते. म्हणजे प्रेप HIVचा प्रतिबंध करते, पण HIV बरा करू शकत नाही.
म्हणजेच प्रेप औषध घ्यायला सुरुवात करण्याआधी, तुम्ही आधीच HIV बाधित तर नाही ना, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही एका ठराविक प्रमाणात ‘प्रेप’ घेत असाल आणि समजा एखाद्या HIVबाधित व्यक्तीबरोबर कंडम न वापरता सेक्स केला, तर तुम्हाला HIV होण्यापासून रोखण्यात हे औषध १०० टक्के प्रभावी ठरतं. ब्रिटिश HIV असोसिएशनच्या (BHIV) मते ‘प्रेप’ची गुणकारकता, वापरकर्त्याच्या नियमितपणावर अवलंबून असते.
काही विरोधकांच्या मते, प्रेपमुळे सुरक्षित लैंगिक संबंध राखण्याच्या संदेशाचं महत्त्व कमी होतं. ऑस्ट्रेलियातील ४ वर्षांच्या अभ्यासातून लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या निरीक्षणाचा त्यांनी दाखला दिला. प्रेपचा वापर वाढला की कंडोमचा वापर कमी होतो, असं त्यांनी म्हटलं होतं. अभ्यासकांच्या मते प्रेप न घेणारे, परिणामी त्याचा फायदा न होणारे पुरुषही विनाकंडोम लैंगिक संबंध राखतात.
जगभरात बऱ्याच देशांमध्ये PrEP वापरलं जातं, पण भारतात त्याचा वापर अद्याप चाचणी स्वरुपात होत आहे, अशी माहिती सोलापूर शासकीय रुग्णालयातील ART सेंटर येथील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अग्रजा चिटणीस यांनी दिली. त्या सांगतात, पाश्चिमात्य देशांमध्ये हाय-रिस्क अॅक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांनी अशा प्रकारच्या गोळ्या घेण्याचं धोरण आलेलं आहे. पण भारतात NACO च्या अजेंड्यामध्ये हा विषय अद्याप चाचणीच्या प्राथमिक टप्प्यापर्यंतच पोहोचला आहे.
भारतात PrEP (Pre-Exposure Prophylaxis) वापरलं जात नसलं तरी PEP (Post-Exposure Prophylaxis) उपचारपद्धतीचा वापर प्रभावी पद्धतीने केला जातो, असं डॉ. चिटणीस यांनी सांगितलं. यामध्ये रुग्ण हा व्हायरसच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याच्या ४ ते ७२ तासांच्या आत या गोळीचा पहिला डोस दिला जातो. त्यानंतर रुग्णाला दुसऱ्या दिवशीपासून डोसेजचा कोर्स दिला जातो. १०+१०+8 अशा स्वरुपात हा कोर्स असतो. 20 दिवसांनंतर रुग्णाचं रूटीन चेकअप केलं जातं. हे उपचार ९९.९ टक्के प्रभावी असल्याचं निदर्शनास आलं आहे, असं डॉ. चिटणीस यांनी सांगितलं.