फोटो सौजन्य: iStock
Happy Diwali 2025: हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी. या दिवसात आपण आपल्या प्रियजनांना भेटतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो आणि त्यांना भेटवस्तू सुद्धा देतो. दिवाळीत प्रत्येक घर आकर्षक रोषणाईने झगमगून जाते. तसेच या सणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील होते. दिवाळीला जसे धार्मिक महत्व आहे तसेच सामाजिक महत्व सुद्धा आहे.
दिवाळीचे धार्मिक महत्त्व म्हणजे असत्यावर सत्याचा विजय, जसे की रावणावर श्रीरामाचा विजय, तर सामाजिक महत्त्व म्हणजे एकत्र येणे, नातेसंबंध मजबूत करणे आणि समृद्धी साजरी करणे. त्यातही दिवाळीतील जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत कारण ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत, जसे की दिवे लावणे, रांगोळी काढणे आणि मिठाई वाटणे. यासोबतच, आधुनिक काळातही नवीन वस्तू खरेदी करणे आणि घरांना आकर्षक पद्धतीने सजवणे यांसारखे नवीन परंपरा स्वीकारल्या गेल्या आहेत.
वाईटावर चांगल्याचा विजय: हिंदू पुराणांनुसार, रावणाचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परतले, या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तेथील लोकांनी दिवाळी साजरी केली. इथूनच दिवाळीची सुरुवात झाली.
इतर धर्मांमध्येही महत्त्व: जैन धर्मात भगवान महावीरांना मोक्ष मिळाल्याचा दिवस, तर शीख धर्मात गुरु हरगोविंद सिंह यांच्या सुटकेची आठवण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
अंधारावर प्रकाशाचा विजय: अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करणे हे दिवाळीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.
दिवाळी हा केवळ दिवे लावण्याचा किंवा फटाके फोडण्याचा सण नाही, तर समाजातील एकोपा, प्रेम आणि आनंद यांचं प्रतीक आहे. या सणाचं सामाजिक महत्त्व वेगवेगळ्या गोष्टीतून दिसून येतं.
एकोपा: दिवाळीच्या काळात वेगवेगळ्या समाजातील सर्वजण एकत्र येतात. आप्तेष्ट, मित्र-नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी भेटीगाठी होतात. यामुळे सामाजिक बंध अधिक मजबूत होतात.
दान आणि मदतीची भावना: अनेक ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने गरजू, वृद्धाश्रम किंवा अनाथालयांना मदत केली जाते.
स्त्री-पुरुष समानता आणि गृहसंस्कृती: घराची स्वच्छता, सजावट आणि फडफडणारे दिवे हे सर्वजण मिळून करतात. त्यामुळे घरगुती कामांमध्ये सर्वांच्या सहभागाची भावना बळकट होते.
दिवा लावणे: प्रत्येक घरात सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावण्याची प्रथा आजही आहे, ज्यामुळे सकारात्मकता आणि मांगल्याची भावना येते.
रांगोळी काढणे: घरासमोर सुंदर रांगोळी काढून घराला सजवण्याची प्रथा आजही लोकप्रिय आहे.
मिठाई वाटणे: दिवाळीत खास पदार्थ आणि मिठाई बनवून इतरांना वाटण्याची जुनी पद्धत आजही सुरू आहे.
अभ्यंग स्नान: नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उटणे लावून तेलाने आंघोळ करण्याची परंपरा आहे. यामुळे शरीर शुद्ध होतं आणि आरोग्य टिकून राहतं.
फराळ बनवणे: चकल्या, करंज्या, लाडू, शेव अशा पारंपरिक पदार्थांचा फराळ घराघरात बनवला जातो. यामुळे कौटुंबिक एकोपा आणि आनंद वाढतो.
भाऊबीज साजरी करणे: दिवाळीचा शेवट भाऊबीजेने होतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीमधील प्रेमाचा हा सुंदर बंध प्रत्येक दिवाळीत जपला जातो.