
प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कच्या संचलनात घुमणार कोकणचा आवाज, पर्यटन विभागाचा 'कोकण पर्यटन' चित्ररथ सज्ज
यंदाच्या चित्ररथाच्या माध्यमातून कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीचे आणि तेथील पर्यटन स्थळांचे हुबेहुब चित्रण करण्यात आले आहे. या चित्ररथात अरबी समुद्राचे रक्षण करणाऱ्या अभेद्य विजयदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्याचबरोबरीने गणपतीपुळे मंदिराचा देखावा पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. कोकणातील निसर्गरम्य चिचोळा प्रदेश आणि आधुनिक पर्यटनाचा भाग असलेले स्कुबा डायव्हिंग, डॉल्फिन प्रतिकृती तसेच जलक्रिडामधील लोकप्रिय बनाना राइडचे कलात्मक सादरीकरण या चित्ररथाद्वारे करण्यात येईल.
कोकणच्या दळणवळणात क्रांती घडवून आणणाऱ्या रो-रो फेरीची प्रतिकृती या चित्ररथाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक असणार आहे. याद्वारे कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर तेथील साहसी पर्यटनाचा आणि आधुनिक पायाभूत सुविधांचा एकत्रित पट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. या चित्ररथाबरोबरच पर्यटन विभागाने एक विशेष गीत देखील तयार केले आहे. या गीतामध्ये कोकणच्या निसर्गापासून ते तेथील लोककला, परंपरा आणि संस्कृतीचे प्रभावी वर्णन करण्यात आले आहे. सदर चित्ररथ २६ जानेवारी रोजी सकाळी शिवाजी पार्क येथील मुख्य संचलनात सहभागी होईल. या चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाचा डंका पुन्हा एकदा देशभर गाजणार आहे.
“कोकणातील पर्यटन वाढविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून आम्ही स्कुबा डायव्हिंग, रो-रो फेरी यांसारख्या साहसी पर्यटन व आधुनिक सुविधांचे सादरीकरण केले आहे. हा चित्ररथ तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा एक उत्तम संगम असून, तो युवकांना आणि पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित करण्यात नक्कीच यशस्वी ठरेल.” – संजय खंदारे, प्रधान सचिव (पर्यटन)
“प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र पर्यटन विभागाने ‘कोकण पर्यटन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार करत सहभाग घेतला आहे. या चित्ररथामधून महाराष्ट्र पर्यटनाचा आधुनिक चेहरा पर्यटकांसमोर येईल. तसेच कोकणची निसर्गसंपदा, ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला आणि गणपतीपुळे यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडेल. चित्ररथाच्या या अनोख्या संकल्पनेमधून कोकण पर्यटनाला अधिक चालना मिळेल अशी आशा आहे.” – डॉ. बी.एन.पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय (भा.प्र.से.)
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.
समुद्रकिनारा हवा तर गोवा कशाला? या शहरात बनत आहे भव्य आर्टिफिशियल बीच, २२५ कोटींचा मेगा प्रोजेक्ट
सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.
अधिकृत संसाधने: