SSPE आजाराचा कोल्हापुरात पहिला बळी! ७ वर्षाच्या चिमुकलीचे गंभीर आजाराने निधन
प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची खूप जास्त चिंता असते. मुलांच्या आरोग्यापासून ते प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींमध्ये मुलांची खूप जास्त काळजी घेतली जाते. मात्र खेळण्याच्या वयात आपलं मुलं अचानक अंथरुणाला खिळलं तर कोणत्याच आईवडिलांना मुलांची अवस्था पाहवत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यात राहणारे सागर पुजारी यांच्या सात वर्षाच्या मुलीला एसएसपीई या गंभीर आजाराची लागण झाली होती. मात्र सहा महिन्यांच्या उपचारानंतर अखेर काल संध्याकाळी तिचा मृत्यू झाला.तिला एसएसपीई (सबएक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफ्लाइटिस) या दुर्मिळ आजाराची लागण झाली होती. मागील सहा महिन्यांपासून ती या गंभीर आजाराशी झुंज देत होती.(फोटो सौजन्य – iStock)
एसएसपीई या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर मुलीची हालचाल पूर्णपणे मंदावली होती. त्यानंतर तिला अनेक झटके येऊ लागले. त्यानंतर तिला तात्काळ उपचारांसाठी रुग्णात दाखल करण्यात आले. सहा महिन्यांआधी तिला अचानक खेळत असताना चक्कर आली होती. डॉक्टरांकडे गेल्यानंतर तिच्या अनेक टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये तिला एसएसपीई या आजाराची लागण झाल्याचे समजले. मात्र दुर्मिळ आजाराचे औषध भारतामध्ये कुठेच उपलब्ध नसल्यामुळे तिच्या वडिलांनी औषध कुठे उपलब्ध होईल हे शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिच्या उपचारासाठी चीनमधून औषध उपलब्ध केले. या उपचारांचा खर्च जवळपास पंधरा ते वीस लाख एवढा आहे. मात्र काल अखेर उपचार सुरु असताताना तिचा मृत्यू झाला.
एसएसपीई या अतिशय दुर्मिळ आणि घातक आजाराचे औषध कुठेही उपलब्ध नाही. हा आजार प्रामुख्याने गोवरची लस न घेतलेल्या बालकांना होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार टाळण्यासाठी लहान मुलांना 15 व्या महिन्यात गोवर लस देणे बंधनकारक आहे. उपचारासाठी रुग्णाच्या मेंदूमध्ये इंजेक्शन दिले. याशिवाय या उपचारांसाठी 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागतो. हा आजार झाल्यानंतर मानवाच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे संपूर्ण शरीराच्या शारीरिक हालचाली पूर्णपणे मंदावतात.