उष्णता कमी करण्यासाठी कोल्ड्रिंक पिण्याऐवजी झटपट बनवा थंडगार नाचणीचे आंबील, पारंपरिक पेयामुळे शरीरात राहील गारवा
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात थंडगार पदार्थांचे सेवन करावे. कारण वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाण्यासोबतच काहीवेळा शरीराची पचनक्रिया शुद्ध बिघडून जाते. ऍसिडिटी, अपचन किंवा पोटात आग झाल्यास विविध थंड पेय प्यायली जातात. पण सतत कोल्ड्रिंक पिण्याऐवजी नाचणीच्या पिठापासून बनवलेले आंबील प्यावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सकाळच्या नाश्त्यात नाचणीचे आंबील प्यायल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुधारते. नाचणी शरीराला थंडावा देते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून नाचणीचे सेवन करावे. कॅल्शियम युक्त नाचणीचे सेवन केल्यामुळे शरीरातील हाडांना भरपूर पोषण मिळते आणि हाडांची झीज होत नाही. तसेच यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते.कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि जास्त फायबर असलेल्या नाचणीचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया नाचणीचे आंबील बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






