
थंडीमध्ये त्वचा राहील कायमच मुलायम! चमचाभर तुपाचा वापर करून घरी बनवा Natural Moisturizer
दिवाळी सण संपल्यानंतर वातावरणात खूप फरक दिसून येतो. हवेमध्ये गारवा जाणवू लागल्यानंतर त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, चेहरा कायमच काळवंडल्यासारखा वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्वचेमधील ओलावा कमी झाल्यानंतर चेहऱ्यावर पांढरे डाग दिसू लागतात. याशिवाय त्वचा पूर्णपणे खरखरीत होऊन जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावरील त्वचेवर भरपूर मॉईश्चरायजर लावावे. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आहारात उष्ण पदार्थांचे सेवन केल्यास संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतील. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये कमीत कमी जंक फूड खावे.(फोटो सौजन्य – istock)
सुंदर त्वचेसाठी महिला कायमच बाजारातील महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. पण यामुळे काहीवेळा त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. महिला कायमच बाजारात विकत मिळणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण त्याऐवजी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करून मॉईश्चरायजर बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला चमचाभर तुपाचा वापर करून नॅचरल मॉईश्चरायजर बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मॉईश्चरायजर चेहऱ्यावर नियमित लावल्यास त्वचा कधीच कोरडी पडणार नाही.
मॉईश्चरायजर बनवण्यासाठी शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करावा. यामुळे मॉईश्चरायजर व्यवस्थित तयार होते आणि चेहऱ्याला कोणतीही इजा पोहचत नाही. मॉईश्चरायजर बनवण्यासाठी तूप, बदामाचे तेल, कोरफड जेल, विटामिन इ कँप्सूल आणि गुलाब पाणी इत्यादी साहित्य लागणार आहे. मॉईश्चरायजर बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये तूप घेऊन त्यात कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल, गुलाब पाणी आणि बदामाचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहा. यामुळे मॉईश्चरायजर व्यवस्थित तयार होईल. तयार करून घेतलेली क्रीम काचेच्या डब्यात भरून ठेवा. रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर मॉईश्चरायजर लावून ठेवा. हे मॉईश्चरायजर दिवसभरातून एकदा चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय मुलायम होईल.
तयार केलेले मॉईश्चरायजर महिनाभर नियमित चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल. तुपामध्ये असलेले गुणधर्म त्वचा कायमच हायड्रेट ठेवतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात. गुलाब पाणी, कोरफड जेल, तूप आणि बदाम तेलाचे एकत्र मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवर ग्लो येईल. गुलाब पाणी त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवते.