आज किरकोळ वाटणाऱ्या या सवयी भविष्यात बनू शकतात Breakup चे कारण; रिलेशनशिपमध्ये कधीही करू नका या चुका
प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना असल्याचे म्हटले जाते. प्रेमाच्या नात्यात काळजी, आपुलकी, विश्वास अशा अनेक भावनांचा समावेश होत असतो. प्रेम हे हळूहळू दोन व्यक्तींमध्ये रुजू लागते आणि दोन व्यक्तींना एकमेकांच्या जवळ आणण्याचे काम करते. आपण त्या व्यक्तिसोबत आपल्या आयुष्यातील सुख-दुःख शेअर करू शकतो तसेच आपला मोकळा वेळ घालवू शकतो. आजकालच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात प्रेमाचे घट्ट नाते पूर्वीप्रमाणे जोडून ठेवणे फार कठीण असते.
प्रेमात प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होणे कठीण असते, आपल्या काही छोट्या चुकांमुळे तुमचे सुंदर नाते संपुष्टात येऊ शकते. सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला किरकोळ वाटू शकतात, मात्र हळूहळू या गोष्टी ब्रेकअपचे कारण बनतात. नातेसंबंधात प्रेम, विश्वास आणि परस्पर समंजसपणा जितका महत्त्वाचा असतो, तितक्याच वेळी चुका ओळखून त्या सुधारणेही तितकेच महत्त्वाचे असते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दीर्घकालीन, हेल्दी रिलेशनशिपमध्ये राहायचे असेल आणि आपले नाते घट्ट बनवून ठेवायचे असेल तर रोजच्या जीवनातील काही शुल्लक चुका टाळणे गरजेचे आहे. आज आपण अशाच काही चुकांविषयी जाणून घेणार आहोत या टाळल्यास तुम्ही तुमचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता.
प्राजक्ता कोळी कर्जत येथे करणार डेस्टिनेशन वेडिंग, फिरण्यासाठीचे परफेक्ट ठिकाण, मुंबईहून कसे जायचे?
नियंत्रण ठेवणे टाळावे
कोणत्याही नात्यात प्रेम, आपुलकी आणि काळजी महत्त्वाची असतेच मात्र हे जास्त प्रमाणात केल्यास तुमच्या पार्टनरला ते त्रासदायक वाटू शकते. नात्यात व्यक्तीला आपली पर्सनल स्पेस देणं गरजेचं असतं. सततचे प्रश्न जसे की, “तू कुठे आहेस?”, “कोणासोबत आहेस?”, “काय करत आहेस” तुमच्या नात्यावर शंका निर्माण करू शकत. तुमच्या जोडीदाराच्या मित्रांच्या किंवा वैयक्तिक आयुष्यात कधीही जास्त हस्तक्षेप करू नये. यवशिवाय तुम्ही तुमच्या पार्टनरला मोकळा वेळ द्या आणि मनापासून व्यक्त होण्याची संधी द्या.
मोकळेपणाने बोला
कोणत्याही नात्यात संवाद हा फार गरजेचा असतो. मोकळ्या संवादातूनच तुम्ही एकेमेकांना समजून घेऊ शकता. अनेकदा आपल्या कोणत्या गोष्टीचे वाईट वाटले की आपण थेट बोलणे बंद करतो, ज्यामुळे दोघांमधील गैरसमज आणखीन वाढू लागतात. ही सवय हळूहळू नात्यात दुरावा आणू शकते. अशात राग आल्यास किंवा कोणत्या गोष्टीचे वाईट वाटल्यास आपल्या जोडीदाराशी संवाद साधा आणि मोकळेपणाने व्यक्त व्हा. तुमचा पार्टनर तुमच्यावर रागावला असेल तर त्याला बोलते करा आणि त्याच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि काही गैरसमज असल्यास ते वेळीच दूर करा.
विनाकारण भांडणे बंद करा
अनेकजण आपल्या पार्टनरचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी नाटकी भांडणं करू पाहतात अथवा काहीजण असेही आहेत ज्यांना फार लहान लहान गोष्टींवरून राग येतो. त्याच त्याच गोष्टींवरून भांडणे बंद करा आणि यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा होणारे वाद तुमचे नाते कमकुवत करत असते. भांडणाच्या वेळी आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा. प्रत्येकवेळी भांडणात आपली बाजू खरी आहे हे सिद्ध करण्याऐवजी कधीकधी आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी तडजोड करायला शिका.