ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसचे लवकर निदान होणे का आहे महत्वाचे?
ऑस्टिओआर्थ्रांयटिस (Osteoarthritis – OA) या व्याधीला बरेचदा “वेअर-अँड-टेअर” आर्थ्रायटिस असे म्हटले जी वाढत्या वयामुळे जडते, ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिस (Rheumatoid Arthritis – RA) मात्र खूप वेगळे आहे. RA ही एक क्रॉनिक ऑटोइम्युन स्थिती आहे व २०२१ च्या अहवालानुसार भारतातील १.३ कोटी लोकांना ती प्रभावित करते. या स्थितीमध्ये, तुमच्या शरीराची संरक्षक यंत्रणा – जिची रचना सामान्यत: संसर्गांशी लढा देऊन त्यांना दूर ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली असते. ती चुकून आपल्याच निरोगी उतकांवर हल्ला करते. RA मध्ये हा हल्ला सायनोव्हियमवर (synovium) म्हणजे सांध्यांची हालचाल सहजतेने होऊ देणारे द्रव तयार करणाऱ्या सांध्यांच्या मऊ अस्तरावर केंद्रित असतो.(फोटो सौजन्य – istock)
रोगप्रतिकार यंत्रणेच्या या चुकीच्या प्रतिसादाच्या परिणामी दीर्घकाळ दाहकारक स्थिती राहते, ज्यामुळे वेदना होतात, सूज येते व स्नायूंत ताठरपणा येतो. कालांतराने, या आजारामुळे कूर्चा व हाडांचे नुकसान होऊ शकते व उपचार न केल्यास इतर अवयवांवरही याचा परिणाम होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर लवकरात लवकर आणि परिणामकारक उपचार मिळाले नाहीत तर त्यामुळे सांध्यांचे कायमचे नुकसान होऊ शकते व अपंगत्व येऊ शकते.
भारतामध्ये, विशेषत: ३० ते ६०(4) वर्षांदरम्यानच्या वयोगटातील, या आजाराने मोठ्या प्रमाणात बाधित होणाऱ्या महिलावर्गामध्ये RA विषयी अधिक जागरुकता येण्याच्या गरजेबद्दल तज्ज्ञांकडून, विशेषत: ह्रुमॅटोलॉजिस्ट्सकडून चिंता व्यक्त केली जात आहे. वाढता प्रादुर्भाव असूनही RA ची पुरेशी दखल घेतली जात नाही व त्यावर पुरेसे उपचार केले जात नाहीत. यामुळे अपरिवर्तनीय हानी होऊ शकते आणि लवकर निदान न झाल्यास अपंगत्व येऊ शकते.
स्नेह नर्सिंग होम आणि नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथील कन्सल्टन्ट ह्रुमॅटोलॉजिस्ट डॉ. शैलजा सबनीस म्हणाल्या, “RA हा एक ऑटोइम्युन आजार आहे, जिथे शरीर स्वत:च्याच सांध्यांवर हल्ला चढविते. यामुळे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते, आणि म्हणूनच हा आजार बळावण्याची गती धीमी करण्यासाठी व वेदनांपासून आराम मिळण्यासाठी लवकर निदान होणे आणि उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हा आजार बहुतेकदा कळेल न कळेल अशा पद्धतीने सुरू होतो. म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यावर RA ची ओळख पटणे आव्हानात्मक ठरू शकते. सकाळच्या वेळी ४५ मिनिटांहून अधिक काळ सांध्यांमध्ये ताठरपणा राहणे, सांध्यांना सतत सूज येणे, अकारण अंगात कणकण राहणे आणि थकव्याने गळून गेल्यासारखे वाटणे असे रेड फ्लॅग्ज दिसले तर ताबडतोब वैद्यकीय मूल्यमापन करून घ्यायला हवे.”
ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसच्या काही मुख्य चिन्हांपैकी एक चिन्ह म्हणजे त्यातील सममिती. एका हाताचे मनगट दुखत असेल, तर दुसरेही दुखते. RA हा आजार सर्वसाधारणपणे हात व पावलांमधील छोट्या सांध्यांवर परिणाम करतो, मात्र तो पसरू शकतो आणि कालपरत्वे आपले स्वरूप बदलू शकतो- ज्यामुळे अगदी रोजची साधी कामे करणेही काही जणांना कठीण ठरू शकते. सममितीमध्ये जाणवणारी सांधेदुखी हे RA चे खास लक्षण असले, तरीही सुरुवातीच्या टप्प्यावर किंवा प्रभावित सांध्यांची संख्या तुलनेने कमी असताना RA असममितीही दिसून येऊ शकते. (6) RA मुळे होणाऱ्या वेदनांमध्ये एक आगळीवेगळी संगती दिसून येते. बरेचदा सकाळच्या वेळी किंवा आराम करताना या वेदना खूप वाढतात आणि हालचाल केल्यावर त्यांत किंचित सुधारणा होऊ शकते. मात्र सतत सक्रिय राहिल्यास, वेदना परत सुरू होऊ शकतात व बरेचदा त्या अधिकच तीव्र झालेल्या दिसतात. सांधे ताठर होणे, सुटणे आणि त्यांना सूज येणे यांचे चक्र हे RA चे व्यवच्छेदक लक्षण आहे – आणि ते लवकरात लवकर ओळखल्यास उपचारांना वेळच्या वेळी दिशा मिळण्यास मदत होऊ शकते.
अबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्स विभागाचे असोसिएट डायरेक्टर डॉ. अंकित राय म्हणाले, “ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिस हा फक्त “म्हातारपणातील आर्थ्ररायटिस” नव्हे. ही एक दीर्घकालीन ऑटोइम्युन स्थिती आहे, ज्यामध्ये निव्वळ लक्षणांपासून आराम मिळविणे पुरेसे ठरत नाही तर त्याहून अधिक उपचारांची गरज भासते. केवळ लवकरात लवकर निदान होणेच नव्हे तर आजाराच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेणारी कायमस्वरूपी, व्यक्तिविशिष्ट देखभाल इथे अत्यावश्यक ठरते. अबॉटमध्ये, आम्ही वेळच्यावेळी निदान व दीर्घकालीन व्यवस्थापन यांना आधार देणाऱ्या साधनांनिशी क्लिनिशियन्स आणि रुग्ण दोघांनाही सक्षम बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे – कारण वेळच्या वेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे जीवनमानाच्या दर्जामध्ये खराखुरा फरक पडू शकतो.”
पात्र आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून संपूर्ण तपासणी करून घेणे RA च्या निदानासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हे निदान वेगवेगळी क्लिनिकल मूल्यमापने, लॅबोरटरीमधील चाचण्या आणि इमेजिंग स्टडीज यांच्या एकत्रित अभ्यासावर आधारित असते. रुग्णांना आज आणि भविष्यकाळातही चांगले आयुष्य जगण्यास मदत करणे हे RA वरील उपचारांचे लक्ष्य आहे. यामध्ये लक्षणांवर नियंत्रण ठेवणे, सांध्यांचे नुकसान रोखणे, त्यांचे कार्य पूर्ववत सुरू करणे तसेच कामे व लोकांशी भेटीगाठींसारखी दैनंदिन जीवनातील कामे करण्यास रुग्णाला सक्षम बनविणे या गोष्टींचा समावेश होतो. योग्य उपचार योजनेचा शोध घेण्यापासून ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसच्या व्यवस्थापनाची सुरुवात होते. तुमच्या डॉक्टरांकडून कदाचित तुम्हाला बायोलॉजिक्स हा पर्याय सुचविला जाईल- हे विशेषीकृत उपचार तुमच्या रोगप्रतिकार यंत्रणेतील सांधेदुखी व सूज यांना कारणीभूत ठरणाऱ्या भागांना लक्ष्य करतात.
बायोसिमिलर्स ही अशी औषधे आहेत ज्यांना तंतोतंत बायोलॉजिक्सनुसार काम करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले आहे. ही औषधे मूळ बायोलॉजिकसारखीच सुरक्षा व फायदे पुरवितात, त्यांची काम करण्याची पद्धत सारख्याच प्रकारची असते व बरेचदा त्यांची किंमत कमी असते. याचा अर्थ अधिकाधिक लोकांना दर्जाशी तडजोड न करता प्रगत उपचार मिळवता येऊ शकतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमची लक्षणे आणि उपचारांची गरज यांना सर्वाधिक साजेसे पर्याय सुचवतील याखेरीज RA च्या व्यवस्थापनासाठी तुम्ही आपल्या जीवनशैलीतही काही बदलांच समावेश करू शकता.
RA ही केवळ म्हातारपणामुळे निर्माण होणारी स्थिती नव्हे तर तो एक हळूहळू गंभीर बनत जाणारा ऑटोइम्युन आजार आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. सांध्यांमध्ये सतत ताठरता राहणे, थकवा किंवा सूज यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये. लवकरात लवकर झालेला वैयक्तिक हस्तक्षेप आणि वैयक्तीकृत देखभाल यांच्या साथीने RA सह जगणाऱ्यांना एक सक्रिय आणि परिपूर्ण आयुष्य जगता येऊ शकते. चला, जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी, वेळच्यावेळी निदान करून घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि माहितीनिशी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांना बळ देण्यासाठी एकत्रितपणे काम करू या – कारण लवकर केलेल्या कृतीमुळे आजाराची दिशा बदलण्यास मदत होऊ शकते.