एग फ्रिजिंगकडे महिलांचा वाढतोय कल (फोटो सौजन्य - iStock)
एक फ्रिगिंज ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे महिलेच्या अंडाशयातून निरोगी अंडी(स्त्रीबीज) बाहेर काढली जातात आणि ती प्रयोगशाळेत शुन्याहून कमी तापमानात गोठवली जातात. भविष्यात जेव्हा त्या महिलेला गर्भधारणा करण्याची इच्छा असते तेव्हा त्यांना मातृत्त्वाचं सुख अनुभवता येत.
या उपायामुळे वाढत्या वयातही महिलांना गर्भधारणा शक्य होते. २० ते ३५ वयोगटातील अनेक महिला एग फ्रिजिंग प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. एग फ्रिजींगमुळे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजेनुसार मातृत्वाचे नियोजन करण्याची संधी मिळते. प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि वयाशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी याकडे एक व्यावहारिक साधन म्हणून पाहिले जाते
एग फ्रिजिंग नक्की काय आहे?
एग फ्रिजिंग ज्याला oocyte cryopreservation असेही म्हणतात. ही एक प्रक्रिया आहे जिथे महिलेची अंडी गोळा केली जातात, गोठवली जातात आणि भविष्यातील वापरासाठी साठवली जातात. जेव्हा एखादी महिला गर्भधारणेसाठी तयार असते, तेव्हा ही अंडी वापरुन शुक्राणूंनी फलित केली जाऊ शकतात आणि गर्भाशयात रोपण केली जाऊ शकतात.
स्पर्म फ्रिझींग म्हणजे नेमकं काय? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
महिलांमध्ये का वाढतोय ट्रेंड
प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या वैद्यकीय समस्या असलेल्या महिला, कर्करोगावर उपचार घेत असलेल्या महिला किंवा वैयक्तिक किंवा करिअरमुळे गर्भधारणा पुढे ढकलू इच्छिणाऱ्या महिला याचा विचार करू शकतात.
३५ वर्षांच्या आधी एग फ्रिज केल्यास ते सर्वात प्रभावी ठरते. बदलती जीवनशैली, वाढती जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत येणाऱ्या समस्यांबाबत जागरुक केले जाते. सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे एग फ्रीझिंगला मुख्य प्रवाहात आणले जाते.
महिलांचा वाढलेला टक्का किती?
दरमहा, नियमित प्रजनन आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ६ महिला एग फ्रीझिंग प्रक्रियेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एग फ्रीझिंगशी संबंधित प्रश्नांमध्ये ६०टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी जागरूकतेअभावी दरमहा केळ २ ते ३ महिला या एग फ्रीझिंग तंत्राबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेत होत्या. मात्र दिवसेंदिवस वाढती जागरूकता आणि गर्भधारणा तसेच कुटुंब सुरू करण्याच्या भविष्यातील आशेमुळे येत्या काळात एग फ्रीझिंगची मागणी देखील वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही एग फ्रीझिंगबाबत माहिती देणारे संवाद सत्र देखील आयोजित केले. ज्या महिलांना भविष्यात ही प्रक्रिया करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल अशी प्रतिक्रिया डॉ. रश्मी निफाडकर, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने केले Eggs Freeze! अनेक वर्षांनंतर केला खुलासा; आईनेही दिली साथ
काय म्हणतात तज्ज्ञ
डॉ. प्रीतिका शेट्टी, स्त्रीरोग आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी सांगतात की, एग फ्रीझिंगबद्दल शंका विचारणाऱ्या महिलांमध्ये वाढ झाली आहे. २० ते ३० वयोगटातील महिला एग फ्रीझिंगबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक महिला करिअरवर लक्ष केंद्रित करतात, शिक्षणाला प्राधान्य देऊ इच्छितात किंवा कुटुंब सुरू करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतात किंवा उशीराने लग्न झाल्यामुळे गर्भधारणा लांबणीवर जाते.
काही महिला कुटुंबात प्रजनन समस्या किंवा स्त्रीबीज संख्या कमी असणे किंवा अकाली रजोनिवृत्तीचा इतिहास यासारख्या वैद्यकीय स्थितीमुळे उपचाराकरिता येतात ज्यामुळे त्यांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम झालेला असतो. या महिला सामान्यतः या प्रक्रियेच्या यशाचा दर आणि दुष्परिणामांबद्दल विचारणा करतात. अनेक महिला याबाबत वैद्यकीय सल्ला घेत आहेत. हल्ली एग फ्रीझिंगला केवळ एक वैद्यकियपर्याय म्हणून न पाहता प्रजनन क्षमतेवर नियंत्रण मिळविण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मर्जीनुसार मातृत्वाची योजना आखता येते