मुंबईच्या पर्यावरणाचा आरोग्यावर वाढता ताण! हवा, उष्णता, आर्द्रता आणि डासजन्य आजारांचा एकत्रित विळखा
World Environmental Health Day: मुंबईकरांच्या आरोग्यावर शहरातील बदलत्या पर्यावरणाचा ताण वाढत आहे. वाढते तापमान, हवेतील प्रदूषक, दमट वातावरण आणि डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती यांचा एकत्रित परिणाम होत आहे. त्यामुळे श्वसनविकार, उष्णतेशी संबंधित त्रास तसेच डेंग्यू-मलेरियासारख्या डासजन्य आजारांचा धोका निर्माण होत आहे. २६ सप्टेंबर या जागतिक पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त पर्यावरणाकडे केवळ प्रदूषणाचा प्रश्न म्हणून नव्हे, तर सार्वजनिक आरोग्याचा विषय म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे.(फोटो सौजन्य – AI)
समुद्रकिनारी दमट हवामान, वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ आणि बदलते पर्जन्यमान यामुळे मुंबईची पर्यावरणीय परिस्थिती अधिक याबाबत गुंतागुंतीची होत आहे. पर्यावरण विभागाचे अविनाश काटे यांनी मुंबईत दिल्लीसारखी परिस्थिती पालिका यंत्रणेकडून हवा गुणवत्तेची नियमित तपासणी आणि आवश्यक कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले.
मुंबईत तापमान फारसे वाढलेले नसले, तरी आर्द्रतेमुळे जाणवणारा उकाडा वाढतो. घामाचे बाष्पीभवन कमी झाल्याने शरीराला उष्णता बाहेर टाकणे कठीण होते. परिणामी थकवा, अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर आणि निर्जलीकरणाचा त्रास होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. वाहनांचा धूर, बांधकामांची धूळ आणि सूक्ष्म कणांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. दमा, अॅलर्जी आणि अन्य श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा त्रास वाढू शकतो. प्रदूषित हवेचा परिणाम फुफ्फुसांसोबत हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो, असे शिवडी टीबी रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र ननावरे यांनी सांगितले.
Healthy Vegetable: हृदय निरोगी, हाडे मजबूत अन् मेंदूलाही फायदा! ‘ही’ हिरवी भाजी शरीरासाठी ठरते वरदान
पावसाळ्यात साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीस पोषक ठरते. घरांच्या परिसरातील टाक्या, कुंड्या, डबे तसेच बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढवू शकते. पाऊस थांबल्यानंतरही हा धोका कायम राहतो. तापमान, आर्द्रता, हवेची गुणवत्ता, पाऊस आणि डासजन्य आजारांची रुग्णसंख्या यांचा एकत्रित अभ्यास केल्यास कोणत्या भागात कोणता आरोग्यधोका वाढत आहे, याचा अधिक अचूक अंदाज घेता येईल.






