विटिलिगो आजाराबाबत काय आहेत गैरसमजुती (फोटो सौजन्य - iStock)
विटिलिगो एक असा त्वचारोग आहे ज्यामध्ये त्वचेवर पांढरे डाग येतात. ही एक त्वचेशी संबंधित समस्या आहे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की कोड झालेल्या लोकांना स्पर्श केला तर त्यांनाही कोड होईल. या आजाराबद्दल असे अनेक गैरसमज आहेत.
हेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी जागतिक विटिलिगो दिन दरवर्षी २५ जून रोजी साजरा केला जातो. डॉ. शरीफा चौसे, त्वचारोगतज्ज्ञ, मुंबई यांनी विटिलिगोबाबत गैरसमज दूर करण्यासाठी काही महत्त्वाची माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
विटिलिगो आजार नक्की काय आहे?
कोड किंवा विटिलिगो हा जगातील सर्वात सामान्य रोगांपैकी एक आहे. वैद्यकीय भाषेत पांढऱ्या डागांना कोड म्हणतात. हा एक प्रकारचा त्वचारोग आहे, ज्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचेचा रंग पांढरा होऊ लागतो. यामध्ये त्वचेचा रंग एकदमच बदलत नाही तर हळूहळू रंग बदलत जातो. हळूहळू हे डाग वाढू लागतात आणि संपूर्ण शरीरावर पसरतात.
अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक या स्थितीचा धोका आणखी वाढवू शकतात. विटिलिगो हा केस आणि डोळ्यांसह संपुर्ण त्वचेला आणि शरीराच्या इतर भागांना प्रभावित करू शकते. विटिलिगोमुळे रुग्णांना निराशा, तणावाचा सामना करावा लागतो. दुर्दैवाने, गैरसमजूती आणि चुकीची माहिती अनेकदा अनावश्यक भीती निर्माण करते.
तमन्ना भाटियाचा BF अभिनेता विजय वर्मा या आजाराने ग्रस्त, स्वतः केला खुलासा
विटिलिगो संबंधित गैरसमजुती
गैरसमज: विटिलिगो हा संसर्गजन्य आहे आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो
वास्तविकता: हे विधान खोटे आहे! समजून घ्या की विटिलिगो शारीरिक संपर्काने, एकत्र जेवल्याने किंवा संवादाद्वारे पसरू शकत नाही. हा एक संसर्गजन्य विकार नाही. म्हणून घाबरून जाऊ नका कारण हा आजार स्पर्श केल्याने पसरत नाही.
गैरसमज : अस्वच्छता किंवा आहारामुळे विटिलिगो होऊ शकतो
वास्तविकता: आहार किंवा अस्वच्छता या स्थितीच्या घटनेत कोणतीही भूमिका बजावत नाही. त्याचा विकास प्रामुख्याने ऑटोइम्यून प्रतिक्रिया किंवा अनुवंशिकतेमुळे होतो, वैयक्तिक स्वच्छता किंवा अगदी खाण्याच्या सवयींमुळे हा आजार होत नाही. म्हणून, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
गैरसमज: विटिलिगो फक्त त्वचेवर परिणाम करतो
वास्तविकता: हे त्वचेवर सर्वात जास्त प्रमाणात आढळून येत असले तरी, ही स्थिती केसांना पांढरे करू शकते आणि त्यात डोळे किंवा तोंडाच्या आत पांढेर डाग पडू शकतात. म्हणून, ही स्थिती शरीराच्या इतर भागांवर कसा परिणाम करते ते समजून घ्या.
गैरसमज : त्वचारोगावर उपचार अशक्य आहे
वास्तविकता: जरी कायमस्वरूपी उपचार नसले तरी, क्रीम, तोंडावाटे घेतली जाणारी औषधे, लाईट थेरेपी आणि स्कीन ग्राफ्टींगसारख्या अनेक उपचारांमुळे प्रभावित भागात रंगद्रव्य कमी होण्यास किंवा पुनर्संचयित होण्यास मदत होऊ शकते. तुमच्यासाठी काय योग्य आहे याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या माहितीशिवाय स्वतःहून कोणतेही क्रीम वापरू नका.
त्वचारोगाबद्दलची वास्तविकता समजून घेतल्याने गैरसमजुतींना आळा घालणे शक्य होते. सहानुभूती, अचूक ज्ञान आणि वेळीच वैद्यकीय सल्ला रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतो. म्हणून काळजी करू नका आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या.