
वेट लॉससाठी इंजेक्शनचा वापर करावा की करू नये (फोटो सौजन्य - iStock)
मात्र या इंजेक्शन्सबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. योग्य माहिती अभावी अनेक जण चुकीचे निर्णय घेतात, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे या औषधांबाबत असलेले काही महत्त्वाचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. डॉ. अपर्णा गोविल भास्कर, बॅरिएट्रिक, हर्निया आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल आणि नमहा हॉस्पिटल्स, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे.
गैरसमज १: वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता नाही
वास्तविकता: वजन कमी करण्याची हे इंजेक्शन्स कोणताही जादूई उपाय ठरत नाही किंवा एका रात्रीत परिणाम दाखवत नाहीत. जरी ते भूक कमी करण्यात मदत करत असले तरी संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचा वापर केल्यासच चांगले परिणाम मिळतात. व्यायामामुळे वजन कमी करताना होणारे स्नायूंचे नुकसान कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारते. त्यामुळे या इंजेक्शन्सकडे वजन कमी करण्याचा एक जलद मार्ग म्हणून पाहू नये.
1 महिन्यात 20 किलो वजन होईल कमी वितळेल चरबी; Baba Ramdev यांनी सांगितला सपाट पोटाचा रामबाण उपाय
गैरसमज २: इंजेक्शन घेत असताना आहाराचे सेवन फारसे आवश्यक नाही
वास्तविकता: इंजेक्शन्स भूक कमी करतात, पण तरीही संतुलित व पोषक आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहारामुळे मळमळ, अशक्तपणा यांसारखे दुष्परिणाम टाळता येतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. आहारात ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी यांचा समावेश करावा आणि जंक फूड, हवाबंद डब्यातील व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत.
गैरसमज ३: केवळ अतिलठ्ठ असलेल्या व्यक्तीच या इंजेक्शन्ससाठी पात्र असतात
वास्तविकता: ३० किलो/चौ.मी. पेक्षा जास्त बीएमआय (BMI) असलेल्या व्यक्तींना, इतर आजार नसले तरी, वजन कमी करण्याची इंजेक्शन्स दिली जाऊ शकतात. तसेच २७ किलो/चौ.मी. किंवा त्याहून अधिक बीएमआय असलेल्या आणि टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या वजनाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनाही ही औषधे उपयुक्त ठरू शकतात. मात्र, ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
गैरसमज ४: कायमस्वरूपी वजन कमी होते
वास्तविकता: लठ्ठपणा ही एक दीर्घकालीन, प्रगतीशील आणि पुन्हा पुन्हा उद्भवणारी आरोग्य समस्या आहे. इंजेक्शन्स बंद केल्यानंतर वजन पुन्हा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन टिकवून ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल, संतुलित आहाराचे सेवन आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
गैरसमज ५: वजन कमी करण्याची इंजेक्शन्स प्रत्येकासाठी एकसारखाच परिणाम देतात
वास्तविकता: प्रत्येक व्यक्तीची शारीरिक रचना वेगवेगळी असल्याने उपचारांना मिळणारा प्रतिसादही वेगवेगळा असतो. शरीराचे वजन, चयापचय, मधुमेह, शारीरीक हालचालीची क्षमता आणि जीवनशैली यांसारख्या घटकांवर डोस व परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या मित्राने किंवा नातेवाईकाने वापरले म्हणून ही औषधं स्वमर्जीने घेऊ नका.
तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
वजन कमी करण्याची इंजेक्शन्स ही प्रभावी साधने असू शकतात, पण ती वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरली पाहिजेत. स्वमर्जीने या औषधांचा वापर केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. योग्य माहिती, वैद्यकीय सल्ला आणि जीवनशैलीतील सकारात्मक बदल यांच्या मदतीनेच वजन कमी करणे शक्य आहे हे लक्षात ठेवा.
Weight Loss Tips : फक्त विचारांनी वजन कमी करता येतं का? काय सांगतात तज्ज्ञ