...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत महिला व बाल सशक्तिकरणासाठी राखीव 3 टक्के निधीपैकी 1 टक्का निधी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 पुरताच हा निर्णय लागू असेल. राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : पीएम आवास योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर आता पुढचा निधी काय मिळेना; लाभार्थी चिंतेत
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3 हजार रुपये दिले आहेत. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना 31 ऑगस्टला पैसे दिले जाणार आहेत. त्याचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. लाडकी बहीण योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी, प्राप्त अर्जाची छाननी, तांत्रिक अडचणींचे निराकरण इत्यादींसाठी अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च होत आहे.
तसेच इतर प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बालविकास विभागास महिला व बाल सशक्तीकरण या योजनेसाठी राखीव असलेल्या 3 टक्के निधीपैकी एक टक्का निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
31 ऑगस्टला मिळणार पैसे
महाराष्ट्रात जुलै महिन्यात अर्ज केलेल्या १.८ कोटी पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३ हजार रुपये देण्यात आले. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या ४५ ते ५० लाख महिलांना ३१ ऑगस्टला ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. हा राज्यस्तरीय कार्यक्रम नागपुरात होणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. २.५ लाखांपेक्षा कमी उत्पनाच्या कुटुंबातील महिला योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
हेदेखील वाचा : केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना लागू होणार सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन; शिंदे सरकारचे ‘हे’ मोठे निर्णय एकदा पहाच