सातारा : हिंदवी स्वराज्याचे प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनोख्या शैलीतला एकमेवद्वितीय पुतळा असणाऱ्या सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरात शंभर फुटी ध्वज उभारण्यात येणार आहे .या भगव्या ध्वजाचे अनावरण नक्षत्राच्या संस्थापिका अध्यक्ष दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली .
तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस प्रमुख समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातारा विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा उंच चबुतऱ्यावर बांधण्यात येणार आहे .शिवतीर्थाच्या विकसनासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले असून, त्यातील ८ कोटी रुपयांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे .या कामाची पाहणी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी दुपारी केली यावेळी सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद निशांत पाटील, माजी नगरसेवक वसंत लेवे, किशोर शिंदे, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष पंकज चव्हाण, संदीप शिंदे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत ,गीतांजली कदम, सुजाता राजे महाडिक, शिवानी कळसकर इत्यादी यावेळी उपस्थित होते
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “छत्रपती शिवरायांचे सर्वधर्मसमभावाचे विचार हे युग प्रवर्तक आहेत. ते आजच्या काळातही लागू होतात. येथील शिवतीर्थावर १०० फुटी उंच भगव्या ध्वजाचे उभारणी करण्यात येणार आहे . या ध्वजाचे अनावरण नक्षत्रच्या संस्थापक अध्यक्ष दमयंतीराजे भोसले करणार आहेत तसेच शिवजयंतीदिनी सकाळी पावणे सात वाजता शिवतीर्थावर शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे . या महाआरतीला जिल्हा प्रशासनातले सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची प्रेरणा आणि अनुभूती समाजाला अखंड होण्यासाठी शिवतीर्थावर शंभर फूट उंचीचा चिरंतन प्रेरणादायी ठरणाऱ्या भगव्या ध्वजाची उभारणी करण्यात आली आहे . हा सोहळा सर्व सातारकरांनी सहभागी होऊन समृद्ध करावा,” असे आवाहन यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. नूतनीकरणाच्या पुढच्या टप्प्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा आणखी उंच चबुतऱ्यावर बसवण्याचे नियोजन असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.