राज्यातील 1183 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 8 महिन्यांत आत्महत्या
मुंबई : यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यांत 1183 शेतकऱ्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक 44 आत्महत्या ऑगस्टमध्ये यवतमाळ जिल्ह्यात झाल्या. या आत्महत्यांमध्ये 607 आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. 306 आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या.
आठ महिन्यात संभाजीनगर विभागात ५२० आत्महत्याची नोंद आहे. पश्चिम विदर्भात ७०७ शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. राज्यात १४ आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यात विदर्भातील ६ आणि मराठवाड्यातील ८ जिल्हे आहेत. या १४ जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतली जाते. ८ महिन्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याचे झालेले नुकसान, कर्जबाजारीपणा, हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीच्यकारणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे दिसते.
यापूर्वीही आकडेवारी आली होती समोर
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, विशेषतः मराठवाड्यात ही परिस्थिती आणखी भयाण आहे. राज्यात तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती गेल्या काही महिन्यांपूर्वीच मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. तसेच मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सरकार गेंड्यांच्या कातडीचे
शेतकरी आत्महत्यांचे सरकारला काही देणंघेणं नाही. महायुतीतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. समाजात फूट पाडतात आणि शेतकरी मात्र मरत राहतो. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे. शेतकरी मेला, कुटुंब उद्धवस्त झाले तरी यांना लाज नाही. कृषी खात्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता कर्मचाऱ्यांना टॅब द्यायचे का लॅपटॉप यावरून वाद सुरू आहेत
– विजय वडेट्टीवार, गटनेते विधानसभा (काँग्रेस)