म्हसवड : म्हसवड (Mhaswad) पोलीस (Police) स्टेशन (Station) हद्दीतील पानवण या गावातील एका ऊसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने गांजा लपवुन ठेवल्याची खबर म्हसवड पोलीसांना समजताच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने म्हसवड पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत पानवण येथील शेतात भेट दिली असता शेतामध्ये सुमारे १५ लाख रुपये किमतीचा गांजा ३ पोत्यांमध्ये लपवुन ठेवल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आल्याने पोलीसांनी याप्रकरणी एक जणास ताब्यात घेत त्याच्याकडुन कसुन चौकशी सुरु केली आहे.
एकाला घेतले ताब्यात
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती पुढीलप्रमाणे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पानवण या गावातील लालासो निवृत्ति शिंदे यांच्या मालकिच्या ऊसाच्या शेतामध्ये प्लास्टिक च्या ३ पोत्यांमध्ये ६० किलो वजनाचा व सुमारे १५ लाख रुपये किमतीचा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने चरण लालासो शिंदे याने लपवुन ठेवला असल्याची माहिती म्हसवड पोलीस स्टेशन चे पो.कॉ. सुरज काकडे यांना समजताच त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी स.पो.नि. राजकुमार भुजबळ यांना दिली, भुजबळ यांनी सदर बातमीची खातरजमा करुन जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांना ही माहिती दिली पोलीस अधिक्षक शेख यांनी यावर त्वरीत कारवाईचे आदेश देताना स्थानिक गुन्हे अन्वेशषन विभागाला सोबत घेण्याच्या सुचना दिल्या.
कोणी केली कारवाई?
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. भुजबळ यांनी एक सयुंक्त पथक तयार करुन पानवण येथील शिंदे यांच्या ऊसाच्या शेतामध्ये भेट दिली असता शेतामध्ये वरील मुद्देमाल पोलीसांना मिळुन आल्याने पोलीसांनी तो जप्त करीत याप्रकणी चरण लालासो शिंदे यास अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. म्हसवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या कारवाई केली.