पिंपरी : पुणे-बंगळुरू महामार्गालगत (Pune-Banglore Highway) किवळे येथे भलामोठा अनधिकृत होर्डिंग (Illegal Hoarding) कोसळून पाच जण ठार झाले. तर, तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वापाच ते साडेपाच वाजता घडली. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 18, 2023
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पाच ठार, तिघेजण जखमी
शोभा विजय टाक (वय 50, रा. पारशी चाळ, देहूरोड), वर्षा विलास केदारी (वय 50, रा. गांधीनगर, देहूरोड), रामअवध प्रल्हाद आत्मज (वय 29, रा. उत्तर प्रदेश), भारती नितीन मंचल (वय 33, रा. मामुर्डी), अनिता उमेश रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. विशाल शिवशंकर यादव (वय 20, रा. उत्तर प्रदेश), रहमद मोहमद अन्सारी (वय 21, रा. बेंगलोर-मुंबई हायवेजवळ, किवळे), रिंकी दिलीप रॉय (वय 45, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
होर्डिंग दुर्घटना प्रकरणात जागामालक नामदेव बारकू म्हसुडगे, होर्डिंग बनवणारा दत्ता गुलाब तरस, होर्डिंग भाड्याने घेणारा महेश तानाजी गाडे, जाहिरात करणारी कंपनी आणि इतर संबंधितांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.