पुणे : भोर तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा- देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सोशल मिडीयावर याबाबत माहिती प्रसिद्ध केली.
या नवीन प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या चार तालुक्यातील नागरिकांना आणि शेतीला याचा लाभ मिळणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाठपुरावा केला असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आभार मानले. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून ६ डिसेंबरला याबाबतच्या मंजूरीचा आदेश जाहीर करण्यात आला आहे. जलशक्ती मंत्रालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोंबर रोजी झालेल्या बैठकीत गुंतवणूक मंजुरी समितीच्या शिफारशीनुसार या प्रकल्पास मंजूरी दिलेली आहे. सिंचन, पूरनियंत्रण आणि बहुउद्देशीय प्रकल्पांवरील सल्लागार समितीच्या अटींच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात आली असल्याचेही जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केले आहे.