मुंबई – सांगलीत साधूंवर हल्ला झाला आहे. पालघरच्या घटनेनंतर लगेचच उद्धव ठाकरेंना फोन करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन कधी करणार? असा खोचक सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यातल्या जत येथील साधू मारहाण घटनेप्रकरणी सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले.
ते म्हणाले की, पालघर मॉब लिंचिंगची सीबीआय चौकशी व्हावी या मागणीसाठी जनआक्रोश यात्रा काढणारे आता सांगलीतील साधूंवर झालेल्या हल्ल्यांवर गप्प बसले आहेत. भाजप हे फालतू आणि क्षुद्र राजकारणाचे दुसरे नाव आहे.
सचिन सावंत पुढे म्हणाले की, पालघर साधू हत्याकांडात भाजपाच्या सत्तेतील गावातील भाजपा पदाधिकारी होते. मुले चोरणाऱ्या टोळीच्या अफवेतून हत्या होती. असे असतानाही गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपने मविआची हिंदू विरोधी म्हणून बदनामी केली. त्याच अफवेतून जतमध्ये साधूंना मारहाण झाली आहे. आता सरकार कोणाचे? सीबीआयकडे केस देणार का? असा सवाल सावंत यांनी सरकारला केला. तसेच भाजपच्या दूटप्पी राजकारणाचा आम्ही निषेध नोंदवतो, असे ते म्हणाले.