फलटण : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग रचनेबाबत ८ हरकती सूचना दाखल झाल्या असून त्या जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविल्या आहेत, तेथे सुनावणी होऊन आवश्यक शिफारशींसह त्या शासनाकडे पाठविल्या जाणार असल्याचे फलटण नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.
फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर करुन त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या असताना त्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा कार्यक्रम सुरु करण्याची अनुमती आल्याने दि. १० ते १४ मे दरम्यान त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागविण्यात आल्या असता नव्याने ६ आणि स्थगिती येण्यापूर्वीच्या २ अशा एकूण ८ हरकती सूचना दाखल झाल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.
फेररचना करण्याची मागणी
नगरपरिषद विरोधी पक्ष नेते अशोकराव जाधव, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक व तत्कालीन शिक्षण मंडळ उपाध्यक्ष तुकाराम गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्षचे महेंद्र सुर्यवंशी बेडके आणि अमिर शेख यांनी दाखल केलेल्या हरकती सूचनामध्ये प्रभाग रचना सलग असेल तर नगरसेवकांना विकासाची कामे करता येतील. त्यासाठी सध्याच्या काही प्रभागातील सलगतेबाबत सूचना केल्या आहेत, तर तुकाराम गायकवाड यांनी संपूर्ण प्रभाग रचना चुकीची असल्याने रद्द करुन फेररचना करण्याची मागणी केली आहे.