
फोटो सौजन्य - Social Media
छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर समीर राजूरकर यांनी महत्त्वाचा पुढाकार घेत ९०० मिमी जलवाहिनी तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या या जलवाहिनीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात तब्बल १७ एमएलडीने वाढ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या वेळेत वीज खंडित होऊ नये यासाठी महावितरण प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये आणि आयुक्त अमोल येडगे उपस्थित होते. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेताना अधिकाऱ्यांना विविध भागांतील असमतोल दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. फीडर लाईनमधून होणाऱ्या बेकायदेशीर नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवून आवश्यक ठिकाणी क्रॉस कनेक्शन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सध्या शहराला दररोज १५५ एमएलडी पाणीपुरवठा होत असून, नवीन जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास पाणीपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे. विशेषतः अपुऱ्या पाण्यामुळे त्रस्त भागांना याचा थेट फायदा होणार असून वितरणातील तफावत कमी करण्यास मदत मिळणार आहे. प्रशासनाने या प्रकल्पाला प्राधान्य देत तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
पाणीपुरवठ्याच्या वेळेत वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन महावितरणशी समन्वय साधत अखंड वीजपुरवठा राखण्यावर भर देण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचा दाब कायम राहून वितरण वेळापत्रक अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे.
याशिवाय प्रत्येक झोननिहाय स्वतंत्र चार्ट तयार करून पाणी वितरणाचे नियोजन अधिक शिस्तबद्ध करण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पाइपलाईन फुटी किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीला लागणारा कालावधी संबंधित लोकप्रतिनिधींना त्वरित कळवण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.