फोटो सौजन्य - Social Media
कोकणातील आंबा वैभव, पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम अनुभवण्याची संधी पर्यटकांना ‘आंबा महोत्सव २०२६’च्या माध्यमातून मिळणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण वर्षानिमित्त पर्यटन विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे १५ ते १८ मे २०२६ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री Shambhuraj Desai यांनी ही माहिती देत पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
‘फार्म टू टेबल’ संकल्पनेवर आधारित या महोत्सवात शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत विविध प्रकारचे आंबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय स्थानिक कोकणी उत्पादने, आंब्यापासून तयार खाद्यपदार्थ आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवादरम्यान दशावतार, पालखी सोहळा, स्वराज्य आख्यान, कोकण कलेक्टिव्ह बँड आणि ‘होम मिनिस्टर’सारखे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगणार आहेत.
पर्यटकांना सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला, तसेच तारकर्ली, मालवण, देवबाग आणि कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवता येणार आहे. स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, जेट स्कीइंग आणि डॉल्फिन सफारीसारख्या जलक्रीडांचाही आनंद घेता येणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद येथून रेल्वे, बस आणि सिंधुदुर्ग चिपी विमानतळाद्वारे महोत्सवस्थळी सहज पोहोचता येणार आहे.
पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे यांनी या महोत्सवामुळे स्थानिक पर्यटन, शेती आणि सांस्कृतिक वारशाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांनी आंबा उत्पादकांसाठी विविध योजनांची माहिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सव अधिक आकर्षक ठरणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “‘आंबा महोत्सव २०२६’ मध्ये ‘फार्म टू टेबल’ संकल्पनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून थेट आणलेले ताजे आंबे ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच स्थानिक कोकणी उत्पादनांची विक्री आणि शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजनही करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोकणची समृद्ध संस्कृती, चव आणि परंपरांचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मी करतो.”






