
आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या बरोबरीने गेली दोन वर्ष पक्षाचे काम करत असताना आढळराव पाटील यांचा राजकीय आलेख कमी होत चालला असल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असावा, असा राजकीय तज्ञांना अंदाज आहे. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रथम शिरूर लोकसभेची निवडणूक लढवली. आपल्या पहिल्याच खासदारकीच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्यात आढळराव पाटील विजयी झाले.
सलग तीन वेळा शिरूर लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे आढळराव पाटील शिवसैनिकांच्या मनात भरले. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना तारण्याचे काम खऱ्या अर्थाने आढळराव पाटील यांनी केले. दरम्यान 2019 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मात्र पराभवानंतर देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या लांडेवाडी येथील निवासस्थानी असणारा प्रत्येक रविवारी भरणारा जनता दरबार चालूच ठेवला. ते सातत्याने लोकसंपर्कात राहिले आणि अद्यापही आहेत. दरम्यानच्या कालखंडात उद्धव ठाकरे यांच्या दरबारात आढळराव पाटील यांना मानाचे स्थान मिळत नसल्याने त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. शिंदेंचे विश्वासु सहकारी म्हणून आढळराव पाटील पश्चिम महाराष्ट्रात परिचित झाले.
2024 साली पुन्हा लोकसभेच्या निवडणुका आल्या. राज्यात भाजपा- शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी महायुती असल्याने शिरूर लोकसभेची उमेदवारी साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे गेली. त्यामुळे उमेदवारी मिळण्यासाठी आढळराव पाटील यांनी पुन्हा शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केला. गेली दिड दोन वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामकाज अत्यंत इमाने – इतबारे करत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या राजकारणात देखील सक्रिय सहभाग घेतला आणि विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना साथ दिली. त्यांना आंबेगांव विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यामध्ये आढळरावांचा सिंहाचा वाटा राहिला.
बैठकीत कार्यकर्त्यांची जाहीर नाराजी व्यक्त
शिवसेना एकनाथ शिंदे गटातील प्रवेशाबाबत होत असलेल्या चर्चा आणि घडामोडी संदर्भात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंचर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका सुनिल बाणखेले या माझ्या विचाराच्या उमेदवार होत्या. नगरपंचायत निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा क्रॉस वोटींगमुळे झाला. पराभवानंतर माझ्या कार्यकर्त्यांची आणि माझी बैठक झाली. त्या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. माझ्या आगामी राजकीय राजकारणासंबंधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.