मुंबई – मुंबईत ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी काढण्यात आलेल्या ६ हजार ८० कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निमित्तानं मुंबईची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या लिलावात काँन्टॅक्टर्सचा ६६ टक्के जास्त लाभ होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. ही कामं अजून सुरु झालेली नाहीत, ती कधी होणार, मुंबईत रस्ते खोदून ठेवणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. यापूर्वी मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी ५ हजारांची टेंडर काढण्यात आली होती, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नसल्यानं हे दर वाढवण्यात आले, त्यांत कंत्राटदारांचा फायदा करण्यात आला असा आरोपही त्यांनी केलाय. दर किमी १० कोटींना होणारा रस्ता या नव्या कंत्राटांमुळे १७ ते १८ कोटींना होणार असल्याची टीका त्यांनी केलीय.
नेमका काय आरोप
मुंबई महापालिकेत लोकप्रतिनिधी नसताना प्रशासकाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या कामाबाबत निर्णय कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. यापूर्वी लिलावाच्या रकमेच्या ८० टक्के रकमेपर्यंत लिलाव करण्यात येत होते. त्यात शिंदे सरकारनं बदल करत ते लिलाव १०० टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कंत्राटदारांना आधीच २० टक्क्यांचा फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर आधीच्या ५००० कोटींच्या कामाला कंत्राटदारांचा प्रतिसाद न मिळाल्यानं प्रशासकांकडून मुंबई महापालिकेचे शेड्यूल ऑफ रेट बदलले. त्यात रस्त्यांच्या कामांचे दर वाढवण्यात आले. त्यात कामांच्या दरात २० टक्के वाढ करण्यात आली. यामुळे कंत्राटदारांचा ४० टक्के फायदा झाल्याचं त्यांनी सांगतिलं. प्रत्यक्षात लिलावावेळी ८ टक्के अधिक वाढीनं कामं देण्यात आली. त्यामुळं हा नफा ४८ टक्क्यांपर्यंत झाल्याचं आदित्य यांनी म्हटलय. याही पुढे जात या कामांवर असलेला १८ टक्के जीएसटी या कंत्राटदारांना वेळा देण्यात येणार आहे. त्यामुळे ६६ टक्के अधिक दराने ही कामे देण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. पाच राष्ट्रीय कंपन्यांना हे टेंडर वेगवेगळ्या वाढीव दरानं देण्यात आल्याचं आदित्य यांचं म्हणणंय. मुंबीतील सगळे रस्ते सिमेंट काँक्रिट करण्याची गरज नाही. ही कल्पना आली कुठून असा सवालही त्यांनी विचारलाय. ठाण्यात सगळे रस्ते सिमेंटचे का झाले नाहीत, असं विचारत मुख्यमंत्री मुंबईवर राग काढत असल्याचं आदित्य म्हणालेत.
कामे कधी होणार-आदित्य ठाकरे
साधारणपणे रस्त्यांची कामे ही १ ऑक्टोबर ते ३१ मे या काळात होतात. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे काम सुरु झाले तर ते पूर्ण कधी होणार, तोपर्यंत रस्ते खड्डेमय अ्सणार का, मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रस्ते करण्यासाठी आधी अनेक संस्थांशी समन्वय साधावा लागतो, तो न साधताच हा निर्णय़ कसा घेण्यात आला, असा सवालही त्यांनी विचारला आहे. विधानसभेत मुंबईच्या रस्त्यांबाबत झालेल्या चर्चेत २०२२ सालातील अडीच हजार कोटींची कामे पूर्ण होण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागेल असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं होतं. आता ही ६ हजार कोटींची कामे होण्यासाठी किती वेळ लागणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
मुंबईला एटीएमसारखे वापरु नका
ही काढलेली कंत्राटं ही मुंबईची आणि मुंबईकरांची लूट असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणय. गेल्या २५ वर्षांत सत्तेत असताना मुंबई महापालिकेचा कारभार शिवसेनेनं चांगला केला. तिला नफ्यात आणलं. मात्र आता या कामांमुळे मुंबई महापालिका तोट्यात जाईल, मुंबई महापालिकेच्या एफडी तोडाव्या लागतील, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेचा वापर एटीएमसारखा करत असल्याचा आरोप करत, हे होऊ देणार नाही असंही आदित्य म्हणालेत.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची माहिती नसते, असंही त्यांनी सांगितलंय. फिल्म सिटीसाआठी २२५ कोटींचं टेंडर काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र फिल्मसिटी ही स्वतंत्र संस्था आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेतून टेंडर काढता येत नाही. याची माहिती मुख्यमंत्र्यांना नसल्याची टीकाही त्यांनी केलीय. त्या टेंडरचं काय झालं हे माहीत नाही.