
Maharashtra Budget 2026, Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (6 मार्च) जाहीर केला. राज्याच्या आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आली. अजित पवार यांच्या निधनानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.
देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाच्या सुरवातीलाच हा संकल्प दिवंगत अजित पवार यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले की, “आज माझं अंतःकरण जड झालंय. आतापर्यंत अजितदादांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. त्यांच्या करड्या स्वभावात एक करडी शिस्त होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाईल आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू केला जाईल. आज मी हा अर्थसंकल्प त्यांना सादर करत आहे…”, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर त्यांनी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी मोठमोठ्या घोषणा केली. राज्याच्या २०२६ च्या अर्थसंकल्पात मुंबई आणि परिसरासाठी विकासाची मोठी दृष्टी (Vision) मांडण्यात आली आहे. मुंबईला जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनवण्यासाठी मेट्रो, नवीन शहरे आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.
१. नवीन मेट्रो प्रकल्प आणि कनेक्टिव्हिटी
मेट्रो लाईन ११: वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया हा २३,४८७ कोटी रुपयांचा पूर्णपणे भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याचा विस्तार धारावी पुनर्वसन प्रकल्पापासून वांद्रे टर्मिनसपर्यंत केला जाईल.
मेट्रो लाईन ८: मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना जोडणारा २२,८६२ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जाणार आहे.
नवी मुंबई कनेक्टिव्हिटी: तळोजा ते खांदेश्वर मेट्रो मार्ग २ मुळे नवी मुंबई विमानतळाचा प्रवास सुखकर होईल.
मेट्रोचे जाळे: राज्यात १,२०० किमीचे मेट्रो मार्ग आणि २०२९ पर्यंत १६५ किमीच्या नवीन मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.
२. रस्ते आणि महामार्ग विकास
समृद्धी महामार्ग जोडणी: दक्षिण मुंबईला थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
किनारी मार्ग (Coastal Road): वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण केला जाईल.
अटल सेतू विस्तार: अटल सेतू आता थेट मुंबई विमानतळाला जोडला जाणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड: पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात आहे.
३. ‘तिसरी’ आणि ‘चौथी’ मुंबईचा उदय
तिसरी मुंबई: उरण परिसरात ‘तिसरी मुंबई’ म्हणून नवीन विकास केंद्र उभारले जाईल.
चौथी मुंबई: वाढवण बंदर परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गृहनिर्माण: एमएमआर क्षेत्रात १० लाख नवीन घरे उभारली जाणार असून अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी कठोर ‘रोडमॅप’ तयार केला आहे.
४. तंत्रज्ञान आणि आर्थिक केंद्र (Global Hub)
५० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट: मुंबई आणि पुण्याला एकत्रितपणे ५० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असणारे केंद्र बनवले जाईल.
गेमिंग सेक्टर: महाराष्ट्रात २९५ हून अधिक गेमिंग स्टुडिओ सुरू करून या क्षेत्रात जगात अव्वल होण्याचा प्रयत्न केला जाईल.
शिक्षण: केंद्राच्या मदतीने मुंबईत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ सुरू केली जाईल.
५. बुलेट ट्रेन आणि रेल्वे
बुलेट ट्रेन: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमधील महाराष्ट्रातील तीन स्थानकांचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल.
पनवेल-कर्जत मार्ग: हा उपनगरीय रेल्वे मार्ग अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाईल.
६. पर्यटन आणि गुंतवणूक
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याने मुंबई, दुबई आणि सिंगापूर येथे विशेष ‘पर्यटन गुंतवणूक कक्ष’ सुरू केले जाणार आहेत.