कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेच्या जवळ रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिली. त्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता त्याने तिथून गोव्याच्या दिशेने पलायन केले. या धडकेत पादचारी अनिल कृष्णा कदम (५६, रा. जानवली बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. जोपर्यंत कार चालकाला पोलीस अटक करत नाही, तसेच महामार्ग प्राधिकरणवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत महामार्गावर रास्ता रोको ठेवण्याचा इशारा देत महामार्गावर ठिय्या आंदोलन छेडले आहे.
[read_also content=”चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना जास्त मदत मिळावी, ठाकरे गटाची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/thackeray-group-demands-more-help-for-cyclone-victims-kankavali-sindhudurg-534558.html”]
आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या ठिकाणी पोलिसांची चर्चा करताना ग्रामस्थांनी प्रांताधिकार्यांना घटनास्थळी बोलवा, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. जोपर्यंत महामार्ग प्राधिकरणावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या प्रकरणी अशोक कृष्णा कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात सकाळी ७ वा. च्या सुमारास झाला. अनिल कदम हे गवंडी काम करत असून शुक्रवारी सकाळी ते मुंबई गोवा महामार्गावरून चालत कामावर जात होते. त्यादरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या परमिट कारने अनिल कदम यांना धडक दिली. त्यानंतर त्या कारचालकाने कारसह तिथून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेला. ही धडक एवढी जोरदार होती की अनिल कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्या कारच्या पुढील बाजूचा बंपर तुटून अपघातस्थळी पडला होता. अपघाताची माहिती मिळताच जानवली ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन अनिल कदम यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जानवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यास भेट देत अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला लवकरात लवकर ताब्यात घेवून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.