
शरद पवारांच्या कार्यकर्त्याने नाकारला AB फॉर्म
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गिरीश गुरनानी हे गेल्या अनेक वर्षापासून महापालिका निवडणुकीसाठी तयारी करत होते. सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात बॅनरबाजी करुन त्यांनी गेल्या काही दिवसाखाली सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.
गुरनानी म्हणाले, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आपण अर्ज भरलेला आहे आणि पक्षाकडून AB फॉर्म सुद्धा देण्यासाठी विचारणा केली आहे. राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांपिकी मी एक. कोथरूड भागात फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण विरोधकांची बाजू लाऊन धरणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख. जनसेवा, समाजकारण आणि पुरोगामी विचारधारा ही माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेली आहे.
मात्र, पुणे महापालिका निवडणुकीसाठी घोषित झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीची युती आणि त्यातून मला विचारणा करण्यात आलेल्या उमेदवारीला मी नैतिकतेच्या आधारावर देत असलेला नकार मी माझ्या पक्षश्रेष्ठींना कळविलेला आहे. महाविकास आघाडी असेल तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. परंतु, ज्यांना टोकाचा विरोध केला, ज्यांच्या विरोधात, पवार साहेबांवर टीका केली म्हणून आपण आंदोलन केले, जे सध्या एका विरुद्ध विचारधारेच्या पक्षासोबत सत्तेत आहेत अशा लोकांबरोबर हातमिळवणी करणे माझ्या तरी मनाला काही पटलेले नाही. माझी कोणाच्याही विरोधात नाराजी नाही. परंतु विचारधारेशी तडजोड करून, मला उमेदवारी नको आहे. तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि मी लढत नसल्याने ज्यांना वाईट वाटले असेल त्यांची मनापासून माफी मागतो.