
पुण्यातून उच्चशिक्षित दांपत्य निवडणुकीच्या रिंगणात; ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 तर सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून मैदानात
सुरेंद्र पठारे हे उच्चशिक्षित असून पुण्यातील प्रतिष्ठित COEP (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे) येथून गोल्ड मेडलिस्ट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशानंतर पुण्यातील भाजप संघटन अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू झाली होती. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘टीम देवेंद्र’ला पूर्व पुण्यातून सक्षम, अभ्यासू आणि तरुण नेतृत्व मिळाल्याची भावना पक्षात व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र पठारे यांच्या माध्यमातून पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, सुरेंद्र पठारे यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनीही प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपली राजकीय वाटचाल सुरू केली आहे. ऐश्वर्या पठारे या उच्चशिक्षित उद्योजिका असून सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार (२०१४) आणि फायनान्शियल टाइम्स बिझनेस अवॉर्ड (२०२२) ने त्या सन्मानित आहेत. सखी प्रेरणा मंच या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. नेतृत्व विकास, महिलांचे स्वावलंबन आणि सामाजिक जागृती यावर भर देणारे कार्यक्रम त्यांनी सातत्याने घेतले आहेत.
वडगाव शेरी परिसरातील हजारो महिलांना एकत्र आणत ऐश्वर्या पठारे यांनी जेजुरी हरिद्रा मार्तंड पूजा हा उपक्रम राबवला होता. हा उपक्रम केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला असून, संपूर्ण वडगाव शेरीत त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. महिलांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमामुळे ऐश्वर्या पठारे यांची ओळख सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रभावी नेतृत्व म्हणून अधिक दृढ झाली आहे.
एकीकडे अभ्यासू, तांत्रिक पार्श्वभूमी असलेले सुरेंद्र पठारे आणि दुसरीकडे सामाजिक जाणीव व उद्योजकीय दृष्टिकोन असलेल्या ऐश्वर्या पठारे या दांपत्यामुळे पूर्व पुण्यातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. उच्चशिक्षित, तरुण आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून मतदार त्यांच्याकडे कसे पाहतात, याकडे आता संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.