
शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे वास्तव्यास आलेल्या बाळूमामाच्या पालखीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांच्या वाहनाचा शिक्रापूर न्हावरा रोड लगत अपघात होऊन पाच वर्षाच्या बालिकेसह आठ भाविक जखमी झाल्याची खळबळजनक घटना घडली असून जखमींवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथे बाळूमामांची पालखी वास्तव्यास आलेली असून सोलापूर जिल्ह्यातील कवे गावातील आण्णा चोपडे यांच्यासह काही भाविक सदर पालखीचे दर्शन घेण्यासाठी आलेले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास सर्व भाविक त्यांच्या जवळील (एमएच ४५ एएफ ८३११ ) या पिकअप वाहनातून जात असताना शिक्रापूर न्हावरा रस्त्यावरील उरळगाव हद्दीतील घाटामध्ये समोरून आलेल्या ट्रॅक्टरची भाविकांच्या पिकअपला जोरदार धडक बसून अपघात झाला. यावेळी अपघातात ट्रॅक्टरचा चक्काचूर झाला असून अपघातात पालखीसाठी आलेले भाविक राजश्री आण्णा चोपडे (वय ४० वर्षे), सुरेखा विभूषण दूरगुडे (वय २८ वर्षे), शोभा परमेश्वर महानवर (वय ६० वर्षे), मीनाबाई मच्छिंद्र वाघमोडे (वय ४५ वर्षे), सावित्रा अविनाश पाटील ( वय ३४ वर्षे), रुपाली आण्णा केतकर (वय ३५ वर्षे), कविता युव्रण बोराटे (वय ३४ वर्षे) व अंजली शाम महानवर (वय ५ वर्षे सर्व रा. कवे ता. म्हाडा जि. सोलापूर) हे आठ जन जखमी झाले.
सर्व जखमींवर शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत आण्णा तुळशीराम चोपडे (वय ४५ वर्षे रा. कवे ता. म्हाडा जि. सोलापूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली मात्र सदर अपघात शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडला असल्याने पुढील तपास शिरुर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.