
विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, खानवडी, एखतपूर, मुंजवडी आणि पारगाव या सात गावांतील सुमारे तीन हजार एकर जमीन विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहे. यापैकी सुमारे ९० टक्क्यांहून अधिक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दहा टक्के मोबदल्यासाठी वनपुरी-उदाचीवाडी येथील सुमारे ६२५ एकर क्षेत्राचे स्वतंत्र भूसंपादन सुरू आहे.
वाटणीच्या वादामुळे प्रक्रिया रखडली
भूसंपादन प्रक्रियेत अनेक कुटुंबांमध्ये जमीन वाटणीवरून अंतर्गत वाद आहेत. भाऊ, बहिणी, आत्या, मामा, चुलतभाऊ, जावई अथवा मुली यांच्यातील हक्क व वाटणीबाबत संमती होत नसल्याने काही कुटुंबांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे काही प्रकरणांतील संमती प्रक्रिया लांबत आहे. दरम्यान, काही प्रकरणांमध्ये मध्यस्थ आणि वकिलांच्या माध्यमातून परस्पर मोबदला मिळविण्याचे प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दिवसा दावे व हरकतींवर सुनावणी आणि रात्री काही प्रकरणांतील मोबदल्याचे व्यवहार शासकीय विश्रामगृहात होत असल्याची चर्चा असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी केला खुलासा
या आरोपांबाबत भूसंपादन अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांनी स्पष्ट केले की, अनेक शेतकऱ्यांच्या मनात विमानतळ प्रकल्पाबाबत शंका असून, मिळालेल्या मोबदल्याचा विनियोग कसा करावा, याबाबतही ते मार्गदर्शनासाठी भेटतात. शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतरही शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद आणि त्यांच्या आग्रहामुळे आपण थांबून त्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
तपासाची भूमिका महत्त्वाची ठरणार
“संध्याकाळी सहापर्यंत कामकाजाची वेळ असली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे उशिरापर्यंत मार्गदर्शन करावे लागते. यामागे अन्य कोणताही हेतू नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर संमती देऊन शासनाला सहकार्य करावे,” असे पांढरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी अथवा अनियमित व्यवहाराबाबत ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याने, या आरोपांबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा तपासाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
पत्रकाराच्या भूमिकेवरही आरोप
दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेबाबत माहिती देणाऱ्या एका स्थानिक पत्रकारावरही अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आंदोलने, तक्रारी आणि विरोध करणाऱ्या व्यक्तींची माहिती प्रशासनाला देत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या पत्रकाराला काही नागरिकांकडून ‘खबरी’ म्हणून संबोधले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांनाही स्वतंत्र पुष्टी उपलब्ध नसल्याने ते आरोप म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.
Ans: पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील सुमारे तीन हजार एकर जमीन आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित केली जात आहे. यापैकी ९० टक्क्यांहून अधिक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते.
Ans: दिवसा शेतकऱ्यांच्या संमती, हरकती आणि दाव्यांवर सुनावणी घेतल्यानंतर रात्री शासकीय विश्रामगृहात काही शेतकऱ्यांना परस्पर मोबदला दिला जात असल्याचे आरोप होत आहेत. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Ans: शेतकऱ्यांच्या शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी कामकाजाच्या वेळेनंतरही थांबावे लागते, असे कल्याण पांढरे यांनी स्पष्ट केले. यामागे अन्य कोणताही हेतू नसल्याचे सांगत त्यांनी आरोप फेटाळले.