धबधब्यावर दुचाकी चोरणारा आरोपी २४ तासात जेरबंद; नेरळ पोलिसांची जलद कारवाई
धबधब्यांवर गर्दी वाढत असताना सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहाची वाडी येथील प्रसिद्ध धबधब्यावर मुंबईहून वर्षासहलीसाठी आलेल्या एका तरुणाची दुचाकी चोरीला गेल्याची घटना नेरळ पोलिस ठाणे हद्दीत घडली. विशेष म्हणजे, सदर गुन्ह्याचा तपास करत नेरळ पोलिसांनी अवघ्या 24 तासात चोराला उल्हासनगर येथून अटक करत दुचाकी हस्तगत केली असून या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबईच्या गोवंडी भागातील हसन रजा सेद्दिक सिद्दिक (वय २८) हा तरुण १८ जून रोजी आपल्या काळ्या रंगाच्या बजाज पल्सर (MH-02-AD-5608) या दुचाकीवरून मोहाची वाडी येथील धबधब्यावर गेला होता. पर्यटकांनी नेहमीप्रमाणे वाहने बाहेर पार्किंगमध्ये ठेवून परिसरात फिरायला जातात. हसन सिद्दिकी यांनी देखील सायंकाळी साडेसहा वाजता आपली दुचाकी धबधब्याजवळ पार्किंगला लावली होती. मात्र सहलीनंतर परत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्यांनी आजूबाजूला शोधाशोध केली, पण दुचाकी कुठेच न सापडल्यामुळे त्यांनी तत्काळ नेरळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
Mumbai Crime : रेल्वे स्टेशनवरून ३२४९ मोबाईल चोरी; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
तक्रार दाखल होताच नेरळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक 93/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 303(2) अंतर्गत नोंद केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. नेरळ पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील नेरळ ते उल्हासनगर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी सुरू केली. यावेळी काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या निदर्शनास आल्या.
तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथील महात्मा फुले नगर भागात छापा टाकला. त्या ठिकाणी राहणाऱ्या पंकज प्रकाश कांबळे (वय 18 वर्षे 10 महिने) या तरुणाकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सदर चोरी गेलेली बजाज पल्सर दुचाकी हस्तगत करण्यात आली असून त्यास अटक करण्यात आली आहे.
Sindhudurg Accident : सिंधुदुर्गात भीषण अपघात! भरधाव बस आणि रिक्षाचा चक्काचूर; चौघांचा जागीच मृत्यू
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा तपास आणि अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम पोलीस उपनिरीक्षक संदीप फड, पोलीस हवालदार सचिन वाघमारे, पोलीस शिपाई अश्रू बेंद्रे, राजाभाऊ केकान, निरंजन दवणे, आणि विनोद वांगणेकर यांनी पार पाडले. सदर गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस हवालदार सचिन वाघमारे करीत आहेत.
या गुन्ह्याच्या उकलासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान, सीसीटीव्ही फुटेज, आणि स्थानिक खबऱ्यांच्या माहितीचा यशस्वी उपयोग करून २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला, हे विशेष उल्लेखनीय आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यटकांच्या विश्वासासाठी ही कारवाई प्रेरणादायक ठरत आहे.