फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचा फार्स, सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांना निलंबीत करा, मंदार हळबे यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी
कल्याण : डोंबिवलीतील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचा फार्स करणारे सहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांना निलंबीत करण्याची मागणी भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे. माजी नगरसेवक हळबे यांनी आरोप केला आहे की, सहाय्यक आयुक्त कुमावतहे तेल लावलेले पेहलवान आहेत. फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचा फार्स करुन त्यांचे अनैतिक धंदे सुरु आहे. तत्कालीन आयुक्त इंदूराणी जाखड यांनी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईचे आदेश कुमावत यांनी दिले होते. कुमावत यांच्या कारवाई पथकातील एका कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असे सूचित केले होते. त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात कुमावत यांनी निलंबनाची कारवाई केली नाही. त्याला पाठीशी घालण्यात धन्यता मानली. ही कारवाई न करता इतर कारवाईत कशी मदत होऊ शकते हा त्यामागच्या त्यांचा उद्देश त्यातून उघड झाला आहे.
बेकायदा बांधकांच्या विरोधातही कुमावत यांनी कारवाई केलेली नाही. गार्डनच्या विकास कामातील बाधितांचे पुनर्वसनाचा प्रश्न असो की, रस्ते रुंदीकरणात बाधिताना केवळ नोटिसा बजावल्या. त्याची पूर्तता केली नाही. त्याऐवजी रस्ते रुंदीकरणास पैसे आहेत का अशी उलट विचारणा कुमावत यांनी केली. त्यांच्या सेवा निवृत्तीस दोन महिने शिल्लक आहे. या निवृत्तीच्या आधी कारवाई न करता आपल्या अंगावर काही येऊ नये यासाठी ते पुंजी गोळा करण्याचे काम करीत आहेत. असे अधिकारी महापालिकेस नक्की कशा करीता हवेत.
याचा विचार आयुक्त आणि दोन्हीअतिरिक्त आयुक्तांनी करावा. त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई आयुक्तांनी कारवी अशी हळबे यांची मागणी आहे. दरम्यान सहाय्यक आयुक्त कुमावत यांच्याकडे या आरोपांविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, फेरीवाल्यांच्या विरोधात नियमीत कारवाई सुरु आहे. त्याच बरोबर हळबे यांच्या अन्य आरोपात ही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया येत आहे.