भिवपुरी रोड स्थानकात येणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे, दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष
कर्जत : रस्त्यांचा पुरता बोजवारा उडाला आहे. या रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले असून त्यामुळे या भागात रोज लहान-मोठे अपघात होत असतात. मुंबई पुणे मेन लाईन वरील नेरळ आणि कर्जत दोन स्थानकाच्या दरम्यान असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे अशी स्थिती आहे.मध्य रेल्वे कडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वे वरील कर्जत स्थानकच्या अगोदर असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्या नंतर डिकसळ गावाकडे रस्ता जातो या रस्त्यावर पावसाळ्यातील खड्ड्यांची दुरावस्था पाहून प्रवासी आणि पर्यटकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहेत. हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचे स्थान असलेल्या भिवपुरी रोड स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे आजूबाजूच्या ग्रामस्थांसाठी महत्त्वाचे ठिकाण असूनही या स्थानक परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे.
भिवपुरी रोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवासी मुंबईकडे कामासाठी जातात अनेक वेळा प्रवासी संघटनांनी समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाला, तसेच स्थानिक ग्रामपंचायत, आमदार, खासदार यांना वारंवार लेखी निवेदन दिले आहेत.मात्र रेल्वे प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत,आमदार, खासदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेकडून केला जात आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यातील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. या गंभीर समस्या कडे रेल्वे प्रशासनाने तसेच स्थानिक ग्रामपंचायत, आमदार ,खासदार तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटना यांनी केली आहे.
दरम्यान संगमेश्वर-वाशी रस्त्याची दुरुस्ती झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच हा रस्ता खराब होऊ लागला आहे. विशेषतः गोपाळवाडी परिसरातील मोरीवर निर्माण झालेला खोल खड्डा अपघातास आमंत्रण देणार आहे. या मोरीवर दोन्ही बाजूंनी रस्ता खचल्यामुळे मोठा खड्डा तयार झाला आहे. हा खड्डा इतका खोल आहे की, रात्रीच्यावेळी गाडी त्यात गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनचालकांसाठी हे ठिकाण अतिशय धोकादायक ठरत असून, अनेकांनी या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.