यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड करावी, कृषी विभागाचे आवाहन
कर्जत: कुशल मजुरांची अनुपलब्धता ही शेतीपुढे सध्याची मोठी समस्या आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या रोजगार संधींमुळे दिवसेंदिवस चांगले मजूर मिळेनासे झाले आहेत. भातशेतीसाठी तर ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने भात लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. तर दुसरीकडे कर्जत तालुक्यामध्ये सध्या भात शेती करताना मजुरांची टंचाई भासत असून दिवसेंदिवस यामुळे शेती करणे अधिक अवघड होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर, भात लागवड अधिक सुलभ आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे तंत्रज्ञान आजच्या काळाची गरज बनले आहे.
दरम्यान, मौजे मुगपे येथील शेतकऱ्यांचे बागेत यांत्रिक भात लागवडीसाठी ट्रेमध्ये रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.ही प्रात्यक्षिक कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी शिंदे,प्रगत शेतकरी असीमकुमार सेन यांच्या माध्यमातून आयोजित केली होती.त्याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी खोपोली सुनील निंबाळकर, तालुका कृषी अधिकारी कर्जत हेमांगी सपकाळे, मंडळ कृषी अधिकारी कर्जत दिनेश कोळी,उपकृषी अधिकारी कर्जत शशिकांत गोसावी, लकळब सचिन केणे,नेरळ मंगेश गलांडे, कशेळे किरण गंगावणे आणि सहाय्यक कृषी अधिकारी पळसदारी श्रद्धा देवकर व इतर सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी ट्रेमधून रोपे तयार करण्याचे सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दाखवले. ही संधी आपल्या शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. यांत्रिकीकरण द्वारे भात पिकाची लागवड करण्याच्या दृष्टीने ट्रे मध्ये रोपे तयार करण्यासाठी प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात शेतीत कार्यक्षमतेत वाढ, मजुरांवरील अवलंबित्व कमी करणे आणि वेळ आणि श्रम वाचवणे शक्य झाले आहे.
या कार्यशाळेत तालुक्यातील सुमारे १५० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना ट्रेमधून भात रोपे तयार करण्याची प्रक्रिया, मशीनद्वारे रोपांची लावणी, तणनाशक फवारणीतील यांत्रिकी मदत, तसेच भात कापणीतील आधुनिक यंत्रसामग्रीचे फायदे यासंदर्भातील माहिती दिली गेली.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भात शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने ट्रे मध्ये भात रोपे तयार करण्याबाबतची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती.
ट्रेमधून रोपे तयार करण्याचे फायदे:
10-15 दिवसांत पूर्ण रोपवाटिका तयार होते.
मजुरांवरील खर्चात 40-50% घट.
मशीन लावणीस योग्य असे मजबुत रोप मिळते.
कमी क्षेत्रात अधिक रोपे तयार होतात.
यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे:
कमी वेळेत अधिक क्षेत्रावर लागवड शक्य.
रोपे समान अंतरावर लावली जातात, त्यामुळे पीक एकसंध उगम घेते.
उत्पादकतेत 15-20% वाढ होते.
मजुरांची आवश्यकता कमी होते.
रासायनिक फवारणी व खत व्यवस्थापन सुलभ होते.