राजापूर : स्वच्छतेची जनगागृती करण्यासाठी राजापूर नगर परिषदेने बाजारपेठेत रंगवलेल्या भिंतीवर काही व्यापारी आपल्या दुकानातील सामान लावत असल्याने आज त्यावर नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मात्र कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा याच व्यापाऱ्याने आपले दुकानातील सामान लावल्याने नगरपरिषदेच्या या कारवाईला केराची टोपली दाखवली आहे.
राजापूर नगरपरिषद गेली दोन वर्ष स्वच्छतेत अग्रेसर असून राज्य पातळीवर बक्षिसपात्र ठरली आहे. स्वच्छतेतले हे सातत्य राजापूर नगरपरिषदेने कायम ठेवले आहे. शहरातील प्रत्येक ठिकाणी राजापूर नगरपरिषद कचऱ्यावर विशेष लक्ष देत असुन संपुर्ण शहरातील कचरा सफाई कर्मचारी उचलत आहे. तरीही शहरातील अनेक नागरिक आपल्या घरातील कचरा नदीपात्रात अथवा सार्वजनिक ठिकाणी टाकत आहेत.
गुरुवारी सकाळी वेळोवेळी समज देऊनही शहरातील एक व्यापारी स्वच्छतेचा संदेश लिहिलेल्या बाजारपेठेतील एका भिंतीवर आपले दुकानातील साहीत्य लावत असल्याने राजापूर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उचलला होता. त्या व्यापाऱ्याचे त्या भिंती जवळचे व भिंतीवरील साहित्य उचलण्याची कारवाई केली होती. मात्र या राजापूर नगरपऱिषदेच्या कर्मचाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा संबंधित व्यापाऱ्याने आपला माल त्या भिंतीवर व भिंतीशेजारी लावून स्वच्छतेचा आपल्याला तिरस्कार असल्याचे सिध्द केले आहे. राजापूर नगरपरिषदेला विचारतो कोण? अशा अविर्भावात या व्यापाऱ्याने पुन्हा आपला माल त्याच ठिकाणी ठेवून स्वच्छतेचा संदेश झाकुण टाकला आहे. त्यामुळे जनसामान्यनमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत म्हणुन कारवाई करणारी नगरपरिषद अशा व्यापाऱ्यांना पाठीशी घालत असते. तर काही स्वतःला राजापूरच्या विकासाचा भाग्यविधाता समजणारे लोकप्रतिनिधीही या विशिष्ठ व्यापाऱ्यांना व नागरिकांना पाठीशी घालत असल्याने जनसामान्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अशा लोकप्रतिनिधींच्या चुकिच्या भुमिकेमुळे आज संपुर्ण बाजारपेठेत अतिक्रमण वाढले असुन बाजारातुन चालणेही सर्वसामान्याना मुश्किल झाले आहे.
राजापूर नगरपरिषदेवर सध्या प्रशासकीय राजवट असताना देखील प्रशासन कारवाई करत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर अशा विघातक प्रवृतीना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधीचाच उपद्रव अति झाल्याने आता सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. सकाळी कारवाई केल्यानंतर पुन्हा काही वेळातच त्याच ठिकाणी आपला माल लावणाऱ्या व्यापाऱ्याने एक प्रकारे राजापूर नगर परिषदेच्या कारवाईलाच केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे.