rahul kanal and aaditya thackeray
मुंबई: ठाकरे गट (Thackeray Group) 1 जुलै रोजी मुंबई पालिकेविरोधात विराट मोर्चा काढणार आहे. पण त्याच दिवशी ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) उद्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल यांनी ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीररित्या जय महाराष्ट्र करत असल्याचं सांगितलं आहे.
राहुल कनाल यांनी ट्वीट केलंय की, “दुःख होतंय!!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांचं न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण ज्यांनी रात्रंदिवस तुमच्यासाठी काम केलंय त्यांना काढू शकत नाही. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अरोगन्स क्या होता है!!!”
Jai Maharashtra !!!
I’m sorry for all my genuine work force who worked day and night and you have to face this because of me and only when you stand for rite and against all odds this is just the start and now you have started it , thank you ?— Rrahul Narain Kanal (@Iamrahulkanal) June 30, 2023
त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिलंय की, “जय महाराष्ट्र ! माझ्यासोबत काम करणाऱ्यांची मी माफी मागतो. तुम्ही रात्रंदिवस काम केलंत. तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतोय. तुम्ही सगळ्या अडथळ्यांचा विचार करून खऱ्यासाठी उभं राहिल्याने हे होतंय. ही फक्त सुरुवात आहे आणि सुरुवात तुम्ही केली आहे. धन्यवाद. ”
राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून याविषयी माहिती देण्यात आली आहे. युवासेनेच्या इन्स्टा पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये राहुल कनाल यांनी पक्षाची साथ सोडल्याचं एकप्रकारे जाहीरच केलं आहे.
युवासेनेच्या नेतृत्वावर गदा?
एकिकडे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे प्रमुख नेतेे सूरज चव्हाण यांची मुंबईतील कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे आणि दुसरीकडे राहुल कनाल यांनी युवा सेनेला रामराम ठोकलाय. त्यामुळे आता ठाकरे पिता-पुत्र काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.