
ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी भाजपचे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांना धनुष्यबाण चिन्हावर उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधूनच राजन साळवी यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. रत्नागिरीचे नगराध्यक्षपद देखील राजन साळवी यांनी भूषवले आहे. तर राजन साळवी यांचा मुलगा अथर्व राजन साळवी हे प्रभाग क्रमांक 15 मधून इच्छुक होते. मात्र शिवसेनेने राजन साळवी यांच्या मुलाला रत्नागिरी नगरपरिषदेमधून उमेदवारी नाकारली आहे. अथर्व साळवी यांना उमेदवारी न मिळाल्याने राजन साळवी नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यात शीतयुद्ध रंगणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे
अथर्व साळवी म्हणाले, “नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही. निवडणूक नाही, पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे.”“आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे. पद असो वा नसो, माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो, २४ तास, दिवस असो वा रात्र, कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे. राजकारण बदलू शकतं, पदं येतात-जातात, पण नातं? ते मात्र कायम राहतं, तुमचं आणि माझं.”
रत्नागिरी नगरपरिषदेत महायुती एकत्र असणार आहे. महायुतीतले पक्ष एकत्र मिळून ही निवडणूक लढवणार असून जागावाटपात प्रभाग क्रमांक १५ भाजपाला मिळणार असल्याचा दावा काही स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यामुळे अथर्व साळवींचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी मिळणार नसल्याचं निश्चित झाल्यानंतर अथर्व यांनी त्यांच्या भावना समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केल्या.