ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा; अतुल लोंढे यांची मागणी
गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोद यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून, हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, ॲड. असिम सरोदे यांनी दोन गंभीर आरोप केले आहेत. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व दोन आमदारांना मारहाण करण्यात आली. हे दोन्ही आरोप मन सुन्न करणारे आहेत. मविआ सरकार पाडण्यासाठी खास व्यवस्थेत गुवाहाटीच्या एका पंचतारांकित हॉटेलात आमदारांना ठेवण्यात आले होते आणि यामागे एक ‘महाशक्ती’ आहे हे जगजाहीर होते.
हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान एका एअर होस्टेसचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आला हा प्रकार सरकारने दीड वर्ष दडपून का ठेवला? महाराष्ट्राच्या जनतेला याची माहिती समजली पाहिजे, सरकारने याची चौकशी करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करावेत, असं लोंढे म्हणाले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, अशा गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर सत्तेत वाटेकरी आहेत. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा जो प्रकार झाला त्या पापात भारतीय जनता पक्षही तेवढाच वाटेकरी आहे म्हणून भाजपाने गुवाहाटी हॉटेलमधील प्रकरणावर खुलासा करण्याची हिम्मत दाखवावी, केवळ बेटी बचाओ, महिला सक्षमीकरणाच्या पोकळ गप्पा मारू नयेत, असेही अतुल लोंढे म्हणाले.
Web Title: Adv the chief minister should clarify the allegation made by asim sarode demand of atul londhe nrdm