पुणे – बाइक-टॅक्सी विरोधी आंदोलन समितीच्या (Anti-Bike-Taxi Movement Committee)वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा (Illegal Bike Taxi) बंद करण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहरातील (Pune) हजारो रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर (RTO Office) ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीनंतर रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आला.
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजमहलबाहेर रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आपापसात भिडले. बाबा कांबळे आणि केशव क्षीरसागर यांच्यात बाचाबाची झाली. राज ठाकरे यांच्यासमोर आपल्याला बोलू न दिल्याने बाबा कांबळे संतप्त झाले. रिक्षाचालकांची भूमिका आपल्याला मांडायची असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावर केशव क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर शाब्दिक वाद वाढला. यावेळी तिथे उपस्थित इतरांनी हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
बाइक टॅक्सीमुळे आमचे जगणे मुश्किल झाले आहे. तुम्ही आजपर्यंत अनेकांचे प्रश्न सोडविले. तुमचा शब्द कोणी टाळत नाही. आमचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे केली. मी या संदर्भात संबंधितांसोबत बोलतो आणि तुम्हाला कळवतो. आज संध्याकाळपर्यंत कोणाशी तरी नक्की बोलणे होईल, असे राज यांनी सांगितले. यानंतर यापूर्वी तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवले आहेत, असे गाऱ्हाणे घातले. यावर राज यांनी आपल्या आसनावरुन उठता उठता, आम्ही फक्त प्रश्न सोडवयालाच असतो, असे म्हटले आहे.