
Maharashtra Drought
दुष्काळसदृश कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे कर्तव्य असून प्रशासनामार्फत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शेतकऱ्यांच्या हिताला आणि मदतीला सर्वोच्च प्राधान्य देऊन शेती, पशुपालन, चारा व पाणीटंचाई यावर तातडीने उपाययोजना करण्याचे सूचित केले. केंद्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना शासन स्तरावरून लवकरच निर्गमित केली जाणार आहे. यामध्ये सर्वसमावेशक मदतीचा समावेश असणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पावसाअभावी सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेतकरी बांधवांना धीर दिला. कृषिमंत्री भरणे म्हणाले की मी स्वतः शेतकरी असून शेतकऱ्यांच्या वेदना आणि परिस्थिती अनुभवली असल्याने आपण शेतकरी बांधवांच्या दुःखात सहभागी असून शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व मदतीसाठी खंबीरपणे उभे राहू. शेतकऱ्यांना पाणीपुरवठा होण्यास अडचण होऊ नये यासाठी वीज महावितरण च्या संबंधित विभागाने डीपी आणि ट्रांसफार्मर योग्य वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश त्यांनी महावितरण विभागास दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले असून मुगाची पेरणी ४७.८३% आणि उडदाची पेरणी ६१.४५% झाली आहे. तसेच कपाशीची ९१.६६% पेरणी झाली असून पिके पाती, फुलोरा व बोंडे धरण्याच्या अवस्थेत आहेत. पावसा अभावी वाढ खुंटली असून पाती व फुलांची गळ होत आहे. तसेच काही ठिकाणी रस शोषक कीड व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीनची ११३.०३% पेरणी झाली असून पीक सध्या शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत आहे. पाण्याच्या ताणामुळे शेंगा चपटी राहून दाणे बारीक राहण्याची व हलक्या जमिनीवरील पिके सुकण्याची शक्यता आहे.
Maharashtra Drought : मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा ‘या’ गोष्टीचा पुनरुच्चार, बळीराजाला दिलासा मिळणार
मका पिकाची १६३.३४% पेरणी झाली असून पिके कणसे भरण्याच्या अवस्थेत आहेत. अपुऱ्या पावसामुळे वाढ खुंटली असून वजनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.तुरीची १३४.३२% पेरणी झाली असून पाण्याच्या ताणामुळे वाढ खुंटली आहे. खरीप बाजरीची ६३.८३% पेरणी झाली असून पावसाच्या खंडामुळे बाजरीची वाढ खुंटून पीक सुकले आहे. जिल्ह्यात एकूण झालेले पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सादर केला.