रखडलेले रस्ते, पुलांच्या कामांना वेग येईल! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांना गती मिळून वाहतुकीसाठी येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत मंगळवार (दि.१७) रोजी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली.
यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील रखडलेल्या रस्त्यांच्या व पुलांच्या कामांची सविस्तर माहिती देवून येणाऱ्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नामदार नितीन गडकरी यांनी ही कामे तातडीने मार्गी लावण्याबाबत ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील पायाभूत सुविधांवर भर देवून मतदार संघात दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते विकासाचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला असून यामध्ये एन. एच. ७५२ जी सावळीविहीर फाटा ते सेंधवा व एन. एच. १६० सिन्नर ते शिकोडी या दोन राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कोपरगाव मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी केंद्रीय रस्ते निधीतून जास्तीत जास्त निधी मिळावा अशी मागणी केली. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोपरगाव मतदारसंघातील रखडलेली रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना गती मिळणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
या प्रमुख मागण्यांबरोबरच शिर्डीकडे जाणारी बहुतांश अवजड आणि प्रवासी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून झगडे फाटा-वडगावपान मार्गे वळवण्यात आली, सततच्या अवजड वाहतुकीमुळे सदर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे भविष्यात झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याप्रमाणे या रस्त्याचीही अवस्था होवून या रस्त्यावरही अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा (राष्ट्रीय महामार्ग १६० बी) या मागाँचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करणे गरजेचे असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत हा रस्ता सिमेंट काँक्रीटीचा करण्याची मागणी केली आहे.
यावेळी एन. एच. ७५२ जी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्यात आले असून या महामार्गावरील पुणतांबा फाटा व बेट नाका येथील उड्डाणपुलाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एन.एच.१६० या राष्ट्रीय महामार्गावरील सावळीविहीर फाटा व झगडे फाटा येथील उड्डाण पुलांची कामे व रस्त्यांचे रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात अशी मागणी केली.






