"कॅप्टन खरातची पाळेमुळे खणू", मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विश्वास
धर्माच्या नावाखाली समाजाचे शोषण करणे अत्यंत क्लेशदायक आहे. कर्तव्यदक्ष महिला पोलिस आधिकारी तेजस्विनी सातपुते या घटनेची सखोल चौकशी करुन नाशिक येथील कॅप्टन अशोक खरात घटनेतील सर्व पाळेमुळे समोर येतील, असा विश्वास जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एका कार्यक्रमानिमित्त संगमनेर येथे आले होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. ते म्हणाले, कॅप्टन अशोक खरात याच्या सर्व भानगडी या निषेधार्ह, संतापजनक आणि सर्वसामान्यांना चीड आणणाऱ्या आहेत. समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली ही विकृती आहे. कॅप्टन खरात याने कोणाची कशी फसवणूक केली, कोणाच्या मालमत्ता त्याने कशा बळकावल्या हे सर्व तपासातून समोर येईल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक नेमले आहे. कॅप्टन अशोक खरात यांच्या मंदिराच्या ट्रस्टमधील कोणी दोषी असेल तर त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. या घटनेमुळे राज्यभर तिव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी काही व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओमध्येही कोणत्या व्यक्ति आहेत, याचाही पोलिस तपास करून पोलखोल करतील, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
Ratnagiri News : प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग; आग्नीतांडवात संपूर्ण इमारत जळून खाक
ॲसिड हल्ला संदर्भात वडगावपान गावातील काही व्यक्तिंना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पण यातून काही निष्पन्न झाले नाही. कोणी बाहेरचा व्यक्ती असावा असा संशय पोलिसांना आहे. हा तपास पुर्णत्वास जावा यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. त्या संदर्भात सतत पाठपुरावाही सुरु आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वच ग्रामपंचायतीनी गावामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करणे ही घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीचा तपास पोलिस अजूनही घेत आहेत. शाळेच्या गेटवर सीसीटीव्ही आहेत की नाही हा देखील प्रश्न आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याशी बोलणे झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. स्थायी आदेशाप्रमाणे मदतीचा निर्णय प्रशासनाच्या पातळीवर होईल, असेही पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
कॅप्टन अशोक खरात याचे शिर्डी कनेक्शनही समोर आले आहे. येथेही त्याच्याविरोधात यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच शिर्डी व परिसरात मोठी मालमत्ता त्याने जमवल्याचे सांगितले जाते. ही मालमता नेमके कोणाच्या नावावर आहे, याचा शोध आता घेतला जात आहे, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनीही या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध करत कॅप्टन खरात याचे अनेक उद्योग बाहेर येतील, असा गौप्यस्फोट केला आहे.






