
सत्यजित तांबेंच्या संगमनेर २.० ची सगळीकडे चर्चा
संगमनेर मधील आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराचा विकास आराखडा नागरिकांच्या सक्रिय सहभागातून तयार व्हावा, या उद्देशाने आमदार सत्यजीत तांबे यांनी ‘संगमनेर २.०’ हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून ते शहरातील नागरिक, विविध संस्था, मंडळे आणि क्षेत्रनिहाय प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत.
हे संवाद सत्र शुक्रवार (१४ नोव्हेंबर) आणि शनिवार (१५ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी ७ वाजता मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे पार पडणार आहे.
तांबे म्हणाले, “संगमनेरच्या विकासाचा आराखडा हा फक्त राजकीय दस्तऐवज नसून, संगमनेरकरांच्या स्वप्नांचे आणि अपेक्षांचे प्रतिबिंब असणार आहे. शहराच्या भविष्यातील दिशेकाठी प्रत्येक नागरिकाचा आवाज महत्त्वाचा आहे.” आत्तापर्यंत या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
शहरविकासात भाग घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गुगल फॉर्मसोबतच आता नागरिकांसाठी खास व्हॉट्स ॲप क्रमांकही सुरु करण्यात आला आहे— ९११२७७३७७३.या नंबरवर आपली सूचना पाठवून सहभाग नोंदवता येईल.
ठाण्यात भाजपला मोठा धक्का; रवींद्र चव्हाणांच्या कार्यपद्धतीला कंटाळून 5 नगरसेवकांनी उचलले मोठे पाऊल
सत्यजीत तांबे यांच्या म्हणण्यानुसार, “संगमनेरचा विकास हा फक्त आमदार किंवा नगरसेवकांचा विषय नाही, तर प्रत्येक संगमनेरकराची जबाबदारी आहे. सर्वांनी मिळून ‘संगमनेर २.०’ आकार द्यायचा आहे.”
डॉक्टर्स, वकील, अभियंते, विद्यार्थी, महिला यांच्यासह विविध संस्थांनी क्यूआर कोड स्कॅन करून तसेच प्रत्यक्ष भेटीत जाहीरनाम्यात काय असावे याविषयीच्या सूचना दिल्या आहेत.
तांबे म्हणाले, “साधारणपणे जाहीरनामा काही मोजक्या व्यक्तींनी बनवला जातो. परंतु यावेळी आम्ही संगमनेरकरांनाच त्यांच्या शहराचा जाहीरनामा तयार करण्याचे आमंत्रण दिले आहे. दोन दिवसांच्या संवाद सत्रात मी स्वतः प्रत्येकाची मते ऐकणार असून त्या सर्वांचा समावेश ‘संगमनेर २.०’ मध्ये केला जाईल.”
बाळासाहेब थोरात आणि डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरने गेल्या काही दशकांत मोठी प्रगती साधली आहे, असे त्यांनी नमूद केले.
हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून विशेषतः युवक, महिला, व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक संस्था प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
गुगल फॉर्म, सोशल मीडिया, ई-मेल, व्हॉट्स ॲप आणि प्रत्यक्ष संवादाद्वारे आतापर्यंत ५ हजारांपेक्षा अधिक सूचना मिळाल्या आहेत.
या सूचनांमध्ये शहर नियोजन, उद्योगवृद्धी, रोजगार, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आदी विविध विषयांचा समावेश आहे.