फोटो सौजन्य: iStock
अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर्जुने येथे बुधवारी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. बिबट्याने रियंका सुनिल पवार (वय ५) या चिमुरडीला तिच्या आईसमोरच उचलून नेले आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले. गुरुवारी (दि. १३) ग्रामस्थांनी गावबंदी, शाळाबंदी पाळत निषेध व्यक्त केला.
बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातील काही जण शेतात शेकोटीजवळ बसले असताना तुरीच्या शेतातून बिबट्या आला आणि अचानक रियांका हिला पळवून नेले. ग्रामस्थांनी रात्रीभर शोधमोहीम राबविल्यानंतर गुरुवारी सकाळी शाळेजवळील हिंगणगाव रस्त्याकाठी तिचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत बिबट्या पकडला जाईपर्यंत गाव बंद ठेवण्याचा व मुलीचा अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेतला.
महायुतीला टक्कर देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन ठरला; शशिकांत शिंदे यांनी दिली माहिती
घटनेबाबत ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पीडित कुटुंबास तात्काळ शासकीय मदत देण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी तहसीलदारांकडे केली.
जिल्ह्यात सुमारे ११५० बिबटे असल्याचा अंदाज असून त्यापैकी फक्त २५ बिबटेच पकडले गेल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात ३५० पिंजरे, ४ थर्मल ड्रोन, ४ ट्रॅंन्क्युलायझेशन गन आणि २५० ट्रॅप कॅमेरे असूनही बिबट्याचा वावर वाढत आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
वाढत्या घटनांना रोखण्यासाठी जिल्ह्याला २२ रेस्क्यू वाहने, अधिक पिंजरे, ट्रँक्युलायझेशन गन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ड्रोन यासारखी अतिरिक्त साधने उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र वनविभागाकडून प्रस्ताव वेळेवर न येण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
घटना समजताच आमदार काशिनाथ दाते यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला. त्यांनी वनविभागाला बिबट्या सापडेपर्यंत गाव सोडू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. बिबट्या नरभक्षक स्वरूपाचा असल्याने त्याला तातडीने पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या आग्रहानंतर आणि बिबट्याच्या बंदोबस्तासाठी दोन वनपथके गावात तैनात करण्याच्या हमीवर मुलीचा अंत्यसंस्कार गुरुवारी सायंकाळी पार पडला.






